Join us

उत्तर पूर्व मुंबईत मराठी मते निर्णायक; ४६ टक्के मराठी मतदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 5:29 AM

लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर-पूर्व मतदारसंघात सातत्याने सत्तांतर होत असून जनता पार्टी, काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या खासदारांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

मुंबई : उत्तर पूर्व मुंबईत मराठी मतदार युती आणि आघाडीच्या उमेदवारासाठी निर्णायक ठरणार आहेत. एकूण मतदारांच्या ४६ टक्केहे मराठी मतदार आहेत. त्यामुळे युती आणि आघाडीच्या उमेदवारांनीही या मतदारांकडे फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर-पूर्व मतदारसंघात सातत्याने सत्तांतर होत असून जनता पार्टी, काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या खासदारांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ राजकारणाच्याबदलत्या घडामोडींमध्ये त्यांच्या हातातून जनता दलाकडे गेला. त्यानंतर मात्र येथील मतदारांनी कधी सेना-भाजप तर, कधी पुन्हा काँग्रेस असा संमिश्र कौल दिलेला आहे. २००९ मध्ये प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या किरीट सोमय्या यांना हरवत राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील २हजार ९३३ मतांनी निसटता विजय मिळवला. त्यानंतर मात्र मोदी लाटेमध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा पाच लाख मते मिळवून किरीट सोमय्यांनी विजयश्री खेचून आणली. आता सोमय्यांचा पत कट झाल्यानंतर, मनोज कोटक निवडणूकीच्या रिंगणात आहेत.आघाडी आणि युतीच्या उमेदवारांचे भवितव्य मराठी मतांवर अवलंबून आहे. मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पश्चिम याभागात मराठी मतदार अधिक आहेत. उत्तर-पूर्व मुंबईत सुमारे १५ लाख २७ हजार ५१४ मतदार आहेत. त्यापैकी ७ लाख १ हजार ३१३ हे मराठी मतदार आहेत. त्या खालोखाल २ लाख ३५ हजार ८१७ हे मुस्लीम मतदार आहेत. यापैकी मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा क्षेत्रात१ लाख ५२ हजार २९२ मतदार आहेत. तर, १ लाख ८१ हजार ४१६ गुजराती मतदारांचा समावेश आहे.

मुलुंड आणि घाटकोपर पूर्व परिसरात गुजराती बहुल लोकवस्ती आहे. यामध्ये २७ हजार ५५१ ख्रिश्चन, तर १ लाख ९९ हजार ७४४ अन्य भाषिकांचा समावेश आहे. या मतांच्या गणितांप्रमाणेच दोन्ही उमेदवारांनी प्रचाराची रणनिती ठरवली आहे.

टॅग्स :मुंबई उत्तर पूर्व