Join us

मराठी जगणार आहे! 'पानिपत'कार विश्वास पाटील, 'मराठी आठव दिवस' च्या वर्षपूर्ती सोहळ्याला सुरुवात

By मनोहर कुंभेजकर | Published: June 26, 2023 6:11 PM

स्वामीराज प्रकाशन आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात 'पूर्वरंग'चे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : दहा कोटींहून लोक अधिक ज्ञानोबा- तुकोबाची भाषा बोलतात. त्यामुळे मराठी  जगणार आहे. टिकणार आहे. अनेक जण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून मोठया पदांवर पोचले आहेत. मीदेखील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलोय. मुलांनी कणखर व्हायचे  असेल तर मराठीशिवाय उपाय नाही," असे प्रतिपादन पानिपत'कार विश्वास पाटील यांनी केले आणि त्यांनी मराठी आठव दिवस उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

स्वामीराज प्रकाशन आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात 'पूर्वरंग'चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंचावरील हुतात्मा स्मारकाच्या प्रतिकृतीला  पुष्प वाहण्यात आले. त्यानंतर 'मुंबईतील देवीची संस्थाने - एक परिक्रमा' या  पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाचे संपादन पत्रकार शिल्पा सुर्वे यांनी केले आहे. "पानिपत"कार विश्वास पाटील आणि प्रसिद्ध कवी महेश केळुसकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन  झाले. यावेळी स्वामीराज प्रकाशनच्या संचालिका सौ रजनी राणे, पूजा राणे, भाऊ कोरगावकर उपस्थित होते. 

स्वामीराज प्रकाशनाच्या 'मराठी आठव दिवस' उपक्रमाच्या वर्षपूर्ती सोहळ्याला रविवारपासून जल्लोषात सुरुवात झाली.दि, २५  ते दि,२६ जून  दरम्यान म्हणजेच सलग तीन दिवस मराठीचा जागर होत आहे. याअंतर्गत वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची पर्वणी मराठीप्रेमीना  मिळणार आहे.

यावेळी मुंबईतील डबेवाल्याला अग्रदूत मानून एक प्रातिनिधिक स्वरूपात त्याचे मंचावर स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात तीन महिलांचा नवदुर्ग पुरस्काराने सन्मान करण्यात आला. नाशिक येथे पुस्तकांचे हॉटेल चालवणाऱ्या भीमाबाई जोंधळे, 'कर्म' या सामाजिक संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जयश्री परब, नालासोपारा आयुर्वेद महाविद्यालय संचालिका डॉ. रूजुता दुबे यांना गौरवण्यात आले.

 मराठी आठव दिवस उपक्रम 

मराठी आठव दिवस उपक्रम गेल्या वर्षी कोल्हापूर येथे सुरू झाला. २७फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा होतो खरा. पण नंतर वर्षभर त्याची आठवण रहावी आणि मराठीपण जे आहे ते वृद्धिंगत व्हावे हा मूळ उद्देश ह्या उपक्रम राबवण्यामागे आहे. म्हणून प्रत्येक महिन्याच्या २७ तारखेला महाराष्ट्रात किंवा देशभरात स्वामीराज प्रकाशनतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यात साहित्य, कला, संस्कृती आणि मराठी बाणा या अनुषंगाने कार्यक्रम सादर  होतात. जिथे जिथे हे कार्यक्रम झाले त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त तीन दिवसांचा सोहळा आयोजित केला गेला आहे. त्याचा शुभारंभ रविवारी झाला.

टॅग्स :मुंबईमराठी