मुंबई : 'जगात हजारो भाषा बोलल्या जातात. त्यापैकी २३१० भाषा लिहिल्या आणि वाचल्या जातात. या सर्व भाषांमध्ये मराठीचा दहावा क्रमांक लागतो . संज्ञापनाच्या बाबतीत नादमाधुर्य असलेली मराठी ही प्रथम क्रमांकाची भाषा आहे. सुमारे २२०० वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या मराठीला आज ना उद्या अभिजात भाषेचा दर्जा नक्कीच मिळेल', अशी भावना ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केली.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पालिका सभागृहात आयोजित मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा पंधरवडा शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.यावेळी ‘मराठी असे आमुची मायबोली’ या विषयावर शोभणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानात त्यांनी संत साहित्य, पद्य, लावणी, नाट्यगीत, चित्रपट गीत तसेच विविध काळांमधील कवी आणि गीतकारांच्या योगदानातून समृद्ध होत गेलेल्या मराठी भाषेचा इतिहास मांडला.
सुमारे २२०० वर्षांचा समृद्ध वारसा असलेली मराठी ही काळानुरुप साकारातच गेली. केवळ मराठीच नव्हे अन्य भाषिकांनीही मराठी भाषेचे गोडवे गायले. मराठी भाषा गौरव दिनासारखा उत्सव जगात कुठेच होत नाही. मराठीचा इतका मोठा उत्सव आपण कवी कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्ताने साजरा करतो, ही बाब अभिमानास्पद असल्याचे शोभणे म्हणाले. तर,महानगरपालिका प्रशासनाच्या कारभारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर होण्याच्या उद्देशाने सर्व विभागांमध्ये मराठी भाषा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे,असे जोशी यांनी सांगितले.