मराठी महिलेला गुजराती व्यक्तीचा मालमत्तेसाठी जाच; मुलुंडनंतर आता कांदिवलीतील प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 10:24 AM2023-10-02T10:24:47+5:302023-10-02T10:25:00+5:30
मुलुंड येथील एका सोसायटीत मराठी महिलेला कार्यालय नाकारल्याचे प्रकरण ताजे असताना आता कांदिवली येथेही असाच प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई : मुलुंड येथील एका सोसायटीत मराठी महिलेला कार्यालय नाकारल्याचे प्रकरण ताजे असताना आता कांदिवली येथेही असाच प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी एका मराठी महिलेची जागा हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुजराती माणसाला धडा शिकवण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते मैदानात उतरले. पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या या महिलेने, ‘’प्रत्येक ठिकाणी मराठी माणसावर अन्याय होईल, प्रत्येक ठिकाणी राज ठाकरे यांची माणसे मदतीला धावतील, असे असेल तर कशाला हवेत पोलिस, त्यापेक्षा सगळी यंत्रणा राज ठाकरे यांच्याकडे द्या,’’ अशी प्रतिक्रिया व्हिडीओत नोंदवली.
मुलुंड येथे मराठी महिलेला घर नाकारणाऱ्या अमराठी पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात मनसेचे कार्यकर्ते त्या महिलेच्या बाजूने मैदानात उतरले होते. आता कांदिवलीच्या चारकोप भागात काहीसा असाच प्रकार घडला आहे. मुंबई पालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या रिटा दादरकर या महिलेने व्हिडीओच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली आहे.
व्हिडीओद्वारे मांडली कैफियत
आमच्या मालमत्तेवर परमार नावाचा माणूस कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने माणसे घुसवली. इलेक्ट्रिक मीटर तोडले.
तक्रार करूनही पोलिसांनी दखल घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला. मराठी माणसाने जगावे की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारण्याची वेळ आली आहे.
पोलिसांना सेट केले आहे. असे असेल तर एकही मराठी माणूस मुंबईत राहणार नाही. मला मनसेने मदत केली. प्रत्येक ठिकाणी राज ठाकरे यांची माणसे मदतीला धावत असतील, तर कशाला हवेत पोलिस, त्यापेक्षा सगळी यंत्रणा राज यांच्याकडे द्यावी, अशी मागणी रिटा दादरकर यांनी व्हिडीओत केली आहे.