आपुल्या घरात हाल सोसते मराठी...; मुंबईत मराठी माणसासाठीच जागा शिल्लक नाहीए का?
By प्रविण मरगळे | Published: September 28, 2023 01:52 PM2023-09-28T13:52:49+5:302023-09-28T13:54:45+5:30
मुंबईत मराठी भाषा टिकली तरच मराठी माणसाचे अस्तित्व कायम राहील. त्यामुळे मराठी माणसांनी केवळ राजकीय पक्षांना दोष न देता आपणही जागरुक राहायला हवे.
“पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी”
कविवर्य सुरेश भट यांच्या या कवितेच्या ओळींची पदोपदी जाणीव मराठी माणसाला कायम होत असते. मराठी माणून व्यवसाय करत नाही म्हटलं जाते, परंतु आज अनेक क्षेत्रात मराठी माणूस उच्च पदावर आणि यशाची शिखरे गाठत आहे. मराठी माणूस व्यवसायातही स्वत:चे अढळ स्थान निर्माण करत आहे. स्टार्टअपमुळे अनेक मराठी मुला-मुलींना प्रोत्साहन मिळाले. त्यात मुंबईत राहणारी तृप्ती देवरुखकर ही महिलाही तिच्या स्वबळावर व्यवसाय उभारण्याचं स्वप्न पाहू लागली. याच व्यवसायाच्या कार्यालयासाठी तृप्ती जागेच्या शोधात होत्या. मात्र मुलुंडमध्ये या महिलेला आलेला अनुभव पाहून मराठी माणसांचा संताप अनावर होत आहे.
तृप्ती देवरुखकर या मुलुंडमधील शिवसदन सोसायटीत जागा पाहण्यासाठी गेल्या तेव्हा तिथे Maharashtrian Not Allowed असं म्हणत त्यांना जागा नाकारण्यात आली. १०६ हुताम्यांनी बलिदान देऊन ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. याच मुंबईत मराठी माणसाला जागा नाकारण्यात आली. दिवसेंदिवस मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे धडकत आहेत. नोकरीच्या निमित्ताने अनेकजण इथं येतात, वास्तव्य करतात. परंतु गेल्या काही वर्षात मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे इथल्या पायाभूत सुविधांचा वाणवा पाहायला मिळत आहे. त्यात मराठी माणसांची लोकसंख्या कमी होतेय आणि इतर भाषिक एकगठ्ठा मतदारसंघ बनवतायेत हे प्रामुख्याने दिसून येते.
तृप्ती यांच्यासोबत मुलुंडमध्ये जो प्रकार घडला. तो सर्रासपणे इतर मराठी लोकांसोबतही घडत असतो. परंतु त्याला वाचा फोडली जात नाही. तृप्ती देवरुखकर यांनी ते धाडस केले. त्यामुळे हे प्रकरण समोर आले. मुलुंड, कांदिवली, बोरिवली या भागात गुजराती लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. आजही इथं मराठी-गुजराती समाज एकोप्याने राहतो. वर्षोनुवर्षे मुंबईत राहणारा परप्रांतीय हा इथल्या मातीत मिसळून कामधंदा करतोय. परंतु काही मुजोर परप्रांतीयामुळे या एकोप्याला धक्का पोहचतोय. मुंबईत मराठी माणूस वेगवेगळ्या राजकीय पक्षात विभागला आहे. तर गुजराती असो वा उत्तर भारतीय हे एकसंघ राहून आपापले प्रतिनिधी निवडून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मुलुंडमध्ये मराठी माणसाला घर नाकारणे ही घटना प्राथमिक स्वरुपाची आहे. आजही अनेक ठिकाणी नॉनव्हेज खातात म्हणून मराठी माणसांना घरे नाकारली जातात. अनेक गृहनिर्माण जाहिरातीत गुजरातींना प्राधान्य असे लिहिले जाते. इतकेच नाही तर अनेक कंपन्यांमध्ये महाराष्ट्रीयन नको असं बोलले जाते. हा सगळा प्रकार दाक्षिणात्य राज्यात खपवून घेतला जात नाही. दक्षिणेकडील राज्यांमध्ये त्यांची भाषा, अस्मिता यांना खूप महत्त्व आहे. तुलनेने महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत मराठी भाषेला दुय्यम स्थान दिल्याचे पाहायला मिळते. बोरिवली-कांदिवली इथं रेल्वे प्लॅटफॉर्मवर गुजराती भाषेत जाहिराती लावल्या जातात. अनेक दुकांनावर आजही मराठी ऐवजी गुजराती भाषेला प्राधान्य दिले जाते.
महाराष्ट्र सरकारने दुकाने-आस्थापने यांच्यावरील पाट्या मराठीत करणे बंधनकारक केले परंतु त्या निर्णयाविरोधात काही व्यापारी कोर्टात गेले, हायकोर्टाने फटकारल्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली. परंतु तुम्ही महाराष्ट्रात आहात, मराठी पाट्या लावाव्या लागतील असं सांगत सुप्रीम कोर्टाने व्यापाऱ्यांना फटकारले आणि त्यांना २ महिन्याची मुदतवाढ दिली. महाराष्ट्रातील मुंबईत मराठी भाषेसाठी कोर्टाच्या आदेशाची वाट पाहावी लागते. मराठी भाषेला विरोध करणारे महाभाग इथं उघडपणे समोर येऊन माज दाखवतात. अलीकडच्या काळात हे प्रमाण वाढत चालले आहे. मराठी भाषा, इथल्या स्थानिकांना डावलून राजकीय पक्ष त्यांच्या सोयीनुसार मतांची गणिते जुळवत असतात त्यामुळे ही वेळ मराठी माणसांवर आली आहे.
१९६० च्या दशकात अशीच अवस्था मराठी माणसांची झाली होती. आपल्याच मातीत मराठी माणसाला परक्यासारखे जगावे लागत होते. अशावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा जन्म झाला. मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी ही पहिलीच संघटना जन्माला आली. जिथे जिथे मराठी माणसांवर अन्याय झाला तिथे बाळासाहेबांची शिवसेना धावून गेली. परंतु कालांतराने शिवसेनेने त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल केले. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्काच्या लढाईकडे हळूहळू दुर्लक्ष झाले. राज ठाकरेंच्या मनसेनेही मराठी पाट्यांसाठी आंदोलने केली, मराठी भाषेवर अन्याय झाला तिथे मनसेने कायम आवाज उचलला. मुलुंडच्या घटनेतही सर्वात आधी मनसेचे कार्यकर्ते मराठी महिलेच्या मदतीला धावले. मनसे स्टाईलने त्यांनी जाब विचारत समोरच्याला माफी मागण्यास भाग पाडले. परंतु मतांच्या गणितात मराठी माणसांची साथ मनसेला कमी मिळाली. भाजपा-काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांनी मराठी माणसाच्या मुद्द्याला कधी प्राधान्याने महत्त्व दिले नाही. राष्ट्रवादीची ताकद मुंबईत जास्त नसली तरी मतांचा विचार करता राष्ट्रवादीनेही कधी मराठी माणसांसाठी ठोस भूमिका घेतल्याचे दिसून येत नाही.
मुंबईत मराठी भाषा टिकली तरच मराठी माणसाचे अस्तित्व कायम राहील. त्यामुळे मराठी माणसांनी केवळ राजकीय पक्षांना दोष न देता आपणही जागरुक राहायला हवे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनुचित घटनांना विरोध केला पाहिजे. राजकीय मतभेद, जात-पात विसरून मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी एकत्र येत संघर्ष केला पाहिजे. मुलुंडच्या घटनेने हा धडा मराठी माणसाने नक्की घ्यावा. अन्यथा मुंबईत मराठी माणसांसाठी भविष्य खूपच घातक होण्याची शक्यता आहे.