मुंबई – मुलुंड येथे मराठी महिलेला जागा नाकारण्याच्या प्रकारावरून आता हा वाद आणखी चिघळत चालला आहे. तृप्ती देवरुखकर या महिला त्यांच्या कार्यालयासाठी जागा शोधत होत्या त्यावेळी मराठी असल्याने त्यांना एका सोसायटीने जागा नाकारली. तृप्ती यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित सोसायटी पदाधिकाऱ्यांना तातडीने जाब विचारला. आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.
या पत्रात संदीप देशपांडे यांनी म्हटलंय की, २०१६ मध्ये मी स्वत: नगरसेवक असताना महापालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडली होती. जी लोकं भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या आणि खाण्यापिण्याच्या सवयी या आधारे घरे नाकारत असतील या विकासकांना भोगवटा प्रमाणपत्र(OC) नाकारण्यात यावे. तसेच ज्या गृहसंकुलामध्ये अशा प्रकारे भेदभाव करणारे असतील तिथे डिरजिस्ट्रेक्शन करून प्रशासक नेमावा. हा प्रस्ताव मुंबई महापालिकेत बहुमताने मंजूर झाला होता. त्यानंतर तो नगरविकास खात्याकडे पाठवला अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच २०१६ पासून हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पडून आहे. तरी या प्रस्तावास मान्यता देऊन तशा प्रकारच्या अधिसूचना आणि कायदा लवकरात लवकर अंमलात आणण्यात याव्या अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. याबाबत संदीप देशपांडे म्हणाले की, कायदा करणे शक्य आहे, फक्त राजकीय इच्छाशक्ती हवी. मतांच्या राजकारणासाठी घाबरून कायदा करणार नाही हे येणारा काळ ठरवेल. मराठी माणसाने विचार करायला हवा त्यांच्यासाठी कोण उभे राहतेय असं त्यांनी सांगितले.
पंकजा मुंडेंनी नाव सांगावे, धडा शिकवू
तृप्ती देवरुखकर यांच्याप्रमाणे मलाही मराठी असल्याने घर नाकारण्यात आले होते असा दावा पंकजा मुंडे यांनी केला त्यावर बोलताना संदीप देशपांडे यांनी म्हटलं की, पंकजा मुंडे या उशीरा व्यक्त झाल्या पण हरकत नाही. आजही त्यांनी सांगावे कुठल्या सोसायटीने त्यांना घर नाकारले. आम्ही पक्ष न बघता मराठी माणूस म्हणून त्यांच्या पाठिशी उभे राहू. ज्या कोणी मराठी म्हणून घर नाकारले त्यांना धडा शिकवू. पंकजा मुंडे यांनी स्वत:ला एकटे समजू नये. भाऊ म्हणून आम्ही पाठिशी उभे राहू असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.
दरम्यान, हा विषय राजकारणाचा नाही. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. मते येतील किंवा मते येणार नाहीत परंतु मराठी अस्मितेशी तडजोड होऊ शकत नाही असंही संदीप देशपांडे यांनी ठामपणे सांगितले आहे.