मुंबई - कला आणि संस्कृतीचा वारसा जपत शास्त्रीय नृत्य, गायन, लोककला, साहित्यासोबतच इतरही विविधांगी कार्यक्रम राबवत समाजातील विविध घटकांमधील कलागुण जगासमोर आणणाऱ्या नेहरू सेंटरच्या वतीने 'ईये मराठीचिये नगरी' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना विनामूल्य आहे.
वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा दरवर्षी महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या पाठीवर जिथे मराठी लोकवस्ती आहे तिथे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार तसेच साहित्य अकादमी या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. याच कारणामुळे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत कुसुमाग्रजांसोबतच साता समुद्रापार गेलेल्या मराठीला विविधांगी कार्यक्रमांद्वारे जणू मानवंदनाच दिली जाते. वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये २८ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता 'इये मराठीचिये नगरी' हा संगितिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. अभिनेते सौरभ गोखले, अभिनेत्री प्राजक्ता दातार, नचिकेत देसाई आणि केतकी भावे-जोशी यांच्या गायनाचा आनंद रसिकांना या कार्यक्रमात लुटता येणार आहे. प्रणव हरिदास, सौरभ शिर्के, झंकार कानडे, हर्ष परमार, संतोष पेडेकर आदी कलावंत विविध वाद्यांच्या माध्यमातून त्यांना साथ करणार आहेत.
नेहरू सेंटरच्या सांस्कृतिक विभागाचे सहसंचालक चंद्रकांत राणे यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या कार्यक्रमाची संहिता लेखन आणि सूत्रसंचालन उत्तरा मोने या करणार आहेत. सर्वोत्तम कथा, कविता, ललित लेखन, अभिवाचन आणि गाणी यांचा या कार्यक्रमात अंतर्भाव असणार आहे. विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाच्या प्रवेशिका सकाळी १०.३० वाजता सभागृहाच्या तिकीट खिडकीवर मिळतील.