मुंबई - अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्येसह देशभरात सोहळ्याचा उत्सव होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक रामजन्मभूमीत येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असून दिग्गजांचीही उपस्थिती आहे. तब्बल ११ हजार व्हीआयपींची उपस्थिती सोहळ्याला असणार आहे. या दिवशी प्रभू श्रीराम यांच्या पुजेचा मान देशभरातील ११ दाम्पत्यांस देण्यात आला आहे. त्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यातील काकंब्रा तालुक्यातील मराठमोळ्या गायकवाड दाम्पत्यासही हा पुजेचा बहुमान मिळाला आहे. त्याबद्दल, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करुन माहिती दिली.
अयोध्येत अठरापगड जाती, आणि सर्वधर्मसमभाव जपत हा दैदिप्यमान सोहळा होत आहे. त्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे धाराशिवला जिल्ह्यातील गायकवाड कुटुंबास मिळालेला पुजेचा बहुमान. धाराशिव जिल्ह्यातील काकंब्रा येथील गायकवाड दाम्पत्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात महाराष्ट्राचं प्रातिनिधिक योगदान देत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. २२ जानेवारी रोजी देशातील ११ जोडप्यांच्या हस्ते प्रभू श्री राम यांची महापूजा होणार आहे. त्यात, महाराष्ट्रभूमीतील गायकवाड पती-पत्नीला हा मान मिळाला आहे. या महापूजेसाठी भटक्या विमुक्त समाजातील (कैकाडी समाजाचे) महादेवराव गायकवाड हे सपत्नीक बसणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची करताना, प्रभू श्रीरामांनी शबरीमातेकडील बोरं खाल्ले होते, याची आठवण सांगितली.
काही प्रसंग.. क्षण आयुष्य अजरामर करतात. असाच एक क्षण श्री तुळजाभवानीच्या अधिष्ठानाने पुण्यभू असलेल्या तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावचे महादेव गायकवाड यांच्या आयुष्यात आला आहे. त्यांच्या कार्याने त्यांना बहुमान मिळवून दिला. गायकवाड हे निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांचे कार्य इतके समृद्ध आणि सामाजिक उन्नतीचे आहे की त्यामुळे त्यांना, प्रभू श्रीरामाच्या पूजेचा मान मिळाला. अयोध्येतील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पूजेसाठी बसण्याचा मान भारतातील ११ कुटुंबाना मिळाला. त्यात महादेवराव गायकवाड उभयता सहभागी होणार आहेत.
पारधी समाजाच्या उत्त्थानासाठी रा. स्व. संघाच्या भटक्या विमुक्त शाखेच्या माध्यमातून ते अविश्रांत कार्यरत आहेत. या कार्याची अभूतपूर्व पावती म्हणजे, प्रभू श्रीरामाच्या पहिल्या पूजेचा बहुमान आहे, असे बावनकुळे यांनी ट्विट करु म्हटले.
" देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके,चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्यासारखे.. "
प्रा.गायकवाड यांना मिळालेला प्रभू श्रीरामाचा हा आशीर्वाद बघून हे काव्य मला आठवले.आणि, शबरीच्या भक्ती व निष्ठेची कहाणी आठवली. कदाचित ती यापेक्षा वेगळी नसावी, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.