सर्वार्थाने आदर्श असलेली मॅरेथॉन कॉसमॉस सोसायटी
By admin | Published: May 24, 2017 01:57 AM2017-05-24T01:57:54+5:302017-05-24T01:57:54+5:30
नांदा सौख्यभरे’ ही ओळ मॅरेथॉन कॉसमॉस सोसायटीला शब्दश: लागू पडणारी आहे. मुलुंड पश्चिम येथे गेल्या १३ वर्षांपासून सुस्थितीत आणि डौलात
सागर नेवरेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘नांदा सौख्यभरे’ ही ओळ मॅरेथॉन कॉसमॉस सोसायटीला शब्दश: लागू पडणारी आहे. मुलुंड पश्चिम येथे गेल्या १३ वर्षांपासून सुस्थितीत आणि डौलात उभी असलेली मॅरेथॉन कॉसमॉस सोसायटी सर्व सुखसुविधांनी युक्त आहे. परिसरातदेखील या सोसायटीने नावलौकिक मिळवला आहे. या सोसायटीला अलीकडेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून ‘सहकार भूषण पुरस्कार २०१६’ने गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारात सन्मानचिन्ह आणि ५१ हजारांच्या धनादेशाचा समावेश आहे. सर्वांगीण विकास साधणाऱ्या सोसायटीला हा पुरस्कार दिला जातो.
सोसायटीची मेंटेनन्स घेण्याची पद्धत, त्या तुलनेत सुखसुविधांची उपलब्धता कशा प्रकारे रहिवाशांना मिळते. सोसायटीतील अन्य उपक्रम कसे राबविले जातात, अशा सर्व बाबींची तपासणी करून हा पुरस्कार दिला जातो. अनेक सोसायट्या या मापदंडामध्ये बसत नाहीत. दर दोन वर्षांनी सरकारकडून पुरस्कारासाठी नाव नोंदणीचे आवाहन केले जाते. सोसायटीतील इत्थंभूत माहिती राज्य सरकारच्या सहकार खात्याकडे द्यावी लागते. सोसायट्यांना गेल्या ५ वर्षांचा तपशीलही देणे गरजेचे असते. त्यानंतर या पुरस्कारापर्यंत पोहोचता येते.
मॅरेथॉन कॉसमॉस सोसायटीची नोंदणी २००४-०५मध्ये करण्यात आली. सोसायटीमध्ये ६ विंग असून, प्रत्येक इमारत १२ मजली आहे. सोसायटीत तब्बल २७२ सभासद आहेत. ४ रो हाउसेस्, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, जीम, बास्केट बॉल ग्राउंड, इनडोअर गेम्स इत्यादी सुविधाही आहेत. या सर्व सुविधा सभासदांना मोफत पुरविल्या जातात. मॅरेथॉन कॉसमॉस सोसायटी मुलुंड पश्चिमेतील सर्वांत उंच सोसायटी होती. पण आता चहूबाजंूनी उंच टॉवर बांधले गेले आहेत. राज्य शासनाचा ‘शेतकरी तुमच्या दारात’ हा उपक्रमही ही सोसायटी यशस्वीपणे राबवत आहे.
या सोसायटीमध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व दिले जाते. सोसायटीमधील प्रत्येक सभासद ओला कचरा आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण व्यवस्थित होईल, याची खात्री करूनच कचऱ्याची विल्हेवाट लावतो. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कम्पोस्ट खतही सोसायटीच्या माध्यमातून तयार केले जाते. वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला जातो. यंदा १० कडुलिंबाची झाडे सोसायटीने लावली. ही सर्व झाडे उत्तम रीतीने सांभाळली जात आहेत.
या सोसायटीत पाण्याचे उत्तम नियोजन केले जाते. आमची सोसायटी टँकरमुक्त असल्याचे येथील पदाधिकाऱ्यांनी अभिमानाने ‘लोकमत’ला सांगितले. स्वच्छतागृह, बाग, स्विमिंग पूल, गाड्या धुण्यासाठी आणि इतर कामासाठी सोसायटीमध्ये २ बोरिंगची व्यवस्था केलेली आहे. सोसायटीच्या परिसरात ३५०हून अधिक औषधी वनस्पती आणि सुशोभित झाडेही लावण्यात आलेली आहेत. त्यांचीही योग्य ती काळजी घेतली जाते. या सोसायटीची वर्षाची उलाढाल तब्बल दीड कोटींची आहे.
सोसायटी पूर्णपणे तंटामुक्त आहे. सोसायटीमध्ये व्यवस्थापकीय कमिटी कार्यरत आहे. काही वाद उद्भवल्यास अन्यथा काही समस्या असल्यास त्यांचे निराकरण कमिटीद्वारे केले जाते. तसेच या कमिटीच्या वर ‘ग्रिव्हियंस रिड्रेसल कमिटी’चीही नेमणूक केलेली आहे. व्यवस्थापकीय समितीकडून दाद न मिळाल्यास सभासद ‘ग्रिव्हियंस रिड्रेसल कमिटी’कडे दाद मागू शकतात. तथापि, गेल्या १३ वर्षांत ‘ग्रिव्हियंस रिड्रेसल कमिटी’कडे कोणताही विषय गेलेला नाही.
आयसीआयसीआय बँकेतर्फेही मॅरेथॉन कॉसमॉस सोसायटीला स्वच्छतेचा पुरस्कार देण्यात आला आहे. ओला आणि सुका कचरा याचे व्यवस्थापन करण्यासाठी महिलांचे मोलाचे सहकार्य मिळते. सोसायटीच्या स्वच्छतेकडे महिलांचे जास्त लक्ष आहे. सोसायटीत ३२ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पार्किंगची उत्तम व्यवस्था आहे. तसेच ३२ सुरक्षा रक्षक, ६ हाउसकिपिंग, २ बगिच्याची देखरेख करणारे कर्मचारी या सर्वांवर देखरेख ठेवणारा एक व्यवस्थापकही सोसायटीत आहे. हिरवागार असा परिसर निर्माण केल्याने आणि सर्व सोयीसुविधा असल्याने या सोसायटीतील प्रत्येकाला याचा अभिमान आहे. सर्व जाती-धर्मांना सामावून घेतल्याने ही सोसायटी खऱ्या अर्थाने आदर्श सोसायटी ठरत आहे.