मुंबई : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात सुरू होत आहे. आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा सुरू झालेला वाद, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, तसंच बीडमधील हिंसाचार आणि ललित पाटील ड्रग्ज प्रकरण असे मुद्दे अधिवेशनादरम्यान गाजण्याची शक्यता आहे. अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून काल रात्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीत उद्धव यांनी आमदारांना अधिवेशन काळात सरकारविरोधात आक्रमक होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंकडून कोणत्या सूचना?
१. हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आपली भूमिका ठामपणे मांडा.
२. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या बांधावर जा.
३. शेतकऱ्यांच्या नुकसानाची तीव्रता जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून देत जास्तीत जास्त मदतीची मागणी करा.
४. पीकविम्याचा मुद्दा आक्रमकपणे मांडा.
५. मुंबईमधील आमदारांनी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवरून आक्रमक भूमिका घ्यावी.
कसं असेल हिवाळी अधिवेशन?
यंदाचं हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनातही पुरवणी मागण्या मांडण्यात येणार असून, त्या मंजुरीसाठी विनियोजन विधेयक सादर केले जाईल. मागील अधिवेशनातील रेकॉर्डब्रेक पुरवणी मागण्यानंतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी किती हजार कोटींच्या पुरवणी मागण्या असतील, याबाबत उत्सुकता आहे.