राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्क परभणी : मराठवाडा हे बर्ड फ्लूचे केंद्र बनले असून, या विभागात आतापर्यंत दोन हजार ५६ कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाला आहे. त्यामुळे विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पक्ष्यांच्या सर्वेक्षणाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.
राज्यात सर्वप्रथम परभणी जिल्ह्यातील मुरूंबा येथे ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या जिल्ह्यातील कुपटा येथे ५००, तर बनवस येथे १६० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून, त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी येेथे ३५०, तर सुकणी येथे ८० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाला आहे. वंजारवाडी येथेही ५५ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील चिंचोर्डी येथे १११ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने संबंधित गावांना प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर केले असून, या गावांमध्ये पक्ष्यांच्या खरेदी-विक्रीला प्रतिबंध आहे.कोंबड्यांबरोबरच कावळ्यांचा मृत्यू होण्याच्या घटनाही मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील मुगगाव येथे ५ दिवसांत ३२ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. आष्टी तालुक्यातील १२ गावांना कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील हुनगुंदा, जालना जिल्ह्यातील अंकुशनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील खेड येथे कावळे मृत आढळले. नांदेडमध्ये पोकुलवाडी, नावंद्याचीवाडी येथे कोंबड्या, बदक व कावळ्यांचे नमुने घेऊन ते भोपाळ येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
लातूरमधील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेचलातूर : केंद्रेवाडी येथे ३५० व सुकणी येथील ८० कोंबड्या दगावल्या होत्या. या मृत कोंबड्यांचे प्रत्येकी पाच नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. यात पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर सुकणी येथील १६ पक्षी नष्ट करण्यात आले. तर केंद्रेवाडी येथील ८ हजार पक्षी नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.