मराठवाडा मुक्तिदिनी संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करावी- दिवाकर रावते
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 07:24 PM2017-09-07T19:24:19+5:302017-09-07T19:24:45+5:30
मराठवाडा मुक्तिलढ्यात अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले, अनेक स्वातंत्र्य सैनिकांना निजामाचा तुरुंगवास भोगावा लागला, मात्र हा मुक्तिदिन केवळ मराठवाड्यातच साजरा होतो.
मुंबई, दि. 7 - मराठवाडा मुक्तिलढ्यात अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले, अनेक स्वातंत्र्य सैनिकांना निजामाचा तुरुंगवास भोगावा लागला, मात्र हा मुक्तिदिन केवळ मराठवाड्यातच साजरा होतो. संपूर्ण महाराष्ट्राने या मुक्तिलढ्याचा सन्मान करावा, त्यासाठी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाप्रमाणेच 17 सप्टेंबर या मराठवाडा मुक्तिदिनी संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी परिवहन तथा खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या मुक्तिलढ्याचा शालेय पाठ्यपुस्तकांमध्येही समावेश करावा असेही त्यांनी म्हटले आहे.
मंत्री रावते म्हणाले आहेत की, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. मात्र निजामशाहीच्या अधिपत्याखाली असलेला मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पोलीस अॅक्शनने स्वतंत्र झाला व निजामाचे राज्य भारतात विलीन करण्यात आले. स्वामी रामानंदतीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढण्यात आला. 1995च्या शिवशाही सरकारच्या कारकिर्दीत 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तिदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आर्य समाजासहीत विविध जनसमुदायाने या लढ्यात भाग घेतला. या लढ्यात मराठवाड्यातील अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले, अनेक स्वातंत्र्य सैनिकांना निजामाचा तुरुंगवास भोगावा लागला. रझाकारी जुलूमशाहीने शेकडो गावे, हजारो कुटुंबं उद्ध्वस्त केली. शिवशाही सरकार आल्यानंतर मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या आग्रही मागणीच्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या माध्यमातून वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष या नात्याने पाठपुरावा केल्यामुळे शिवशाही शासनाने 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तिदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. वैधानिक विकास मंडळाच्या निधीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात मराठवाडामुक्ती स्मृतीस्तंभ उभारण्यात आले व 1998 पासून मराठवाड्यामध्ये हा स्मृतिदिन 15 ऑगस्ट प्रमाणे साजरा करण्यात येतो.
मात्र या दिवशी उर्वरीत महाराष्ट्र हा दैनंदिन व्यवहारांमध्ये मग्न असतो, या मुक्तीलढ्याचा संपूर्ण महाराष्ट्राने सन्मान करण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाप्रमाणे 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रासाठी शासकीय सुटीचे आदेश काढावे, जेणेकरून या लढ्याचा महाराष्ट्रभर शौर्यपूर्ण सन्मान होईल, समर्पणाचा सन्मान करून मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्यावा, अशी मागणी मंत्री श्री. रावते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.