लग्नसराईला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल
By admin | Published: May 2, 2016 02:22 AM2016-05-02T02:22:16+5:302016-05-02T02:22:16+5:30
मोसमातील लग्नाच्या शेवटचा मुहूर्ताचा फायदा घेत एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी जादा वाहतूक करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच दुसरीकडे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने
मुंबई : मोसमातील लग्नाच्या शेवटचा मुहूर्ताचा फायदा घेत एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी जादा वाहतूक करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच दुसरीकडे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने रविवारी घेतलेल्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे अक्षरश: हाल झाले. उशिराने धावत असलेल्या लोकल, प्रचंड प्रमाणात झालेली गर्दी आणि त्यातूनच प्रवास करताना प्रवाशांची मोठी दमछाक होत होती. त्यामुळे लग्नसराईसाठी जाणाऱ्यांना रविवारचा प्रवास नकोसा झाला.
पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून सफाळे ते वैतरणादरम्यान अप मार्गावर सकाळी ७ ते सायंकाळी ५.१५ असा सव्वादहा तासांचा ब्लॉक घेतला होता. या ब्लॉकमुळे बोरीवली ते डहाणूदरम्यान लोकल तसेच मेमू, डेमू सेवेवर मोठा परिणाम झाला. १५ लोकल फेऱ्या, ११ मेमू व डेमू सेवा तसेच नऊ लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द करतानाच २0 ट्रेन अंशत: रद्द केल्या होत्या. याचबरोबर हार्बरच्या माहीम जंक्शन स्थानकातील प्लॅटफॉर्मचे १२ डबासाठी काम करण्यात आले. या कामासाठीही सकाळी १० ते संध्याकाळी ६ असा तब्बल आठ तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात आला. हा ब्लॉक आणखी एक तास जादा चालला. त्यामुळे संध्याकाळी ६नंतर सुरू होणाऱ्या सीएसटी ते अंधेरी दरम्यानच्या लोकल गाड्यांना चांगलाच लेटमार्क लागला आणि प्रवाशांचा प्रवास लांबत गेला. माहीम जंक्शनजवळ काम चालणार असल्याने या कामासाठी पश्चिम रेल्वेने १० लोकल फेऱ्या रद्द केल्या होत्या.
मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.५0 ते दुपारी ३.५0 असा चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळविण्यात आल्या. डाऊन धिम्या मार्गावरील विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानक लोकल गाड्यांना उपलब्ध नव्हते. ही स्थानके गाठण्यासाठी प्रवाशांना अप मार्गाच्या दिशेने प्रवास करावा लागत होता. प्रवाशांच्या सोयीसाठी अप जलद मार्गावरील लोकलला मुलुंड, भांडुप, विक्रोळी स्थानकांतही थांबा देण्यात येत होता. या मार्गावरील लोकल २० मिनिटे उशिराने धावत होत्या.