सचिन लुंगसे
मुंबई : मुंबईचे पर्यावरण आणि जंगल वाचवण्यास सुरू केलेल्या मोहिमेच्या अनुषंगाने अभ्यासाअंती मुंबईतील ४२ टक्के जंगल ३० वर्षांत नष्ट झाले, असा निष्कर्ष पर्यावरण क्षेत्रातील वातावरण फाउंडेशन या संस्थेने काढला. मुंबईत पर्यावरणासंबंधीच्या अभ्यासाअंती अनेक निष्कर्ष काढण्यात आले. त्यानुसार ४० वर्षांत मुंबईतील हिरवळ सुमारे ६० टक्क्यांनी कमी झाली. आता शहरात केवळ १३ टक्के हिरवळ आहे.
शहरातील एकूण ८८ प्रभागांपैकी ६८ प्रभागांतील हिरवळ गेल्या २० वर्षांत कमी झाली. सर्वाधिक फटका गोरेगावला बसला. २००१ मध्ये ६२.५% भागांत हिरवळ असलेल्या गोरेगावात २०११ मध्ये केवळ १७ टक्के हिरवळ उरली. अंधेरी पश्चिम, मालाड भागातील हिरवळ कमी झाली. अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले, सायन, परळ, दादर, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला व पवई या परिसरात हिरवळीची कमतरता आहे. रस्ते दुरुस्तीसह प्रकल्प व अन्य कामांसाठी २०१८ साली १२ हजार, २०१९ साली १४ हजार झाडांवर संकट ओढावले.
जंगल मुंबईला वाचवते, आपण जंगलाला वाचविले पाहिजेआरे येथील ८०० एकर जंगल वाचविण्यासाठी सरकार काम करत आहे ही चांगली गोष्ट आहे. जगभरातील इतर शहरे पाहिली तर मुंबई एकमेव शहर आहे की जेथे जंगल आहे. मुंबई महानगर प्रदेशात तिवरांचे जंगल आहे. आपण आपली जैवविविधता टिकविण्यास काम केले पाहिजे. कारण १८ लाखांपैकी १० लाख पेशी धोक्यात आल्या आहेत. म्हणून जंगल टिकले पाहिजे. यासाठी आम्ही काम करत आहोत. भांडुप येथे काम सुरू झाले आहे. जंगल मुंबईला वाचवते आहे. आपण जंगलाला वाचविले पाहिजे. आमच्या प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी निदर्शनास येतील त्या आम्ही जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारला लक्षात आणून देणार आहोत.- भगवान केशभट, संस्थापक, वातावरण फाउंडेशन
आरेला वन म्हणून मान्यता देणे गरजेचे!मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारख्या काँक्रिटच्या जंगलात फुलपाखरांच्या आजही सुमारे १७५ प्रजाती आहेत. मात्र झाडे नष्ट होत राहिली तरी सर्व जीवांना याचा फटका बसेल. मुंबईतील हिरवळ टिकवण्यासाठी काम करणाऱ्या सिटीझन्स कलेक्टिव संस्थेने ‘बायोडायव्हर्सिटी बाय द बे’ या अभियानाची घोषणा आणि पाच कलमी कृती योजना हाती घेतली आहे. यामध्ये कमी संख्येतील फ्लेमिंगो, त्यांच्या वसतिस्थानांच्या संरक्षणाचा समावेश आहे. आरेला वन म्हणून मान्यता देणे, मुंबईतील हिरवाईचे संरक्षण करणे आदी विविध शिफारशींचा समावेश करण्यात आला आहे.