मुंबई : वाहतूकदारांसाठी मुंबईत ट्रक टर्मिनल उभारा, नाही तर अवजड वाहनांवर लादण्यात आलेली दक्षिण मुंबईतील प्रवेशबंदी उठवा, अशी मागणी करत बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने (बीजीटीए) आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत सरकारने निर्णय जाहीर केला नाही, तर आक्रमक मार्गाने सरकारशी लढा देऊ, अशा मोजक्या शब्दांत बीजीटीएने शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला अल्टिमेटम दिला आहे.बीजीटीएचे अध्यक्ष विजय रावल म्हणाले की, वाहतूक विभागाने सकाळी सात वाजल्यापासूून मध्यरात्रीपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. मात्र त्यामुळे वाहतूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान होत असून माथाडी कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. परिणामी, या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करत या आठवड्यात बीजीटीए शिष्टमंडळाने दुसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र सखोल चर्चा झाली नसल्याने वाहतूकदारांनी काही अंशी नाराजीही व्यक्त केली आहे. बंदीचे कारण काय?मेट्रो कामांच्या ठिकाणी होणाºया वाहतूककोंडीचे कारण देत प्रशासनाने अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी केली. मात्र वर्दळीच्या वेळी अशीही वाहनांना प्रवेशबंदी आहे. गोदामे आहेत, तेथे कोणत्याही प्रकारचे मेट्रोचे काम सुरू नाही. मग नेमकी वाहनांवर कोणत्या कारणाने बंदी लादली, हेच कळत नसल्याचे संघटनेचे खजिनदार अभिषेक गुप्ता म्हणाले.प्रशासनाच्या निर्णयामुळे वाहतूकदारांची कोंडीइतर सर्व शहरांत ट्रक टर्मिनलची व्यवस्था असून मुंबईतील वडाळ्यामधील प्रस्तावित ट्रक टर्मिनल प्रशासनाने रद्द केल्याने वाहतूकदारांची कोंडी झाली आहे. त्यामुळे आधी ट्रक टर्मिनल उभारा, मगच अवजड वाहनांना शहरात बंदी लादा, असे संघटनेचे सरचिटणीस अनिल विजन यांनी सांगितले.
मालवाहतूकदारांचा सरकारला ३१ मार्चचा अल्टिमेटम, दक्षिण मुंबईतील प्रवेशबंदी हटवा, ट्रक टर्मिनलची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:55 AM