Join us

मार्च महिन्यात ५.७४ दशलक्ष ग्राहकांनी घेतली मोबाइल क्रमांक बदलण्याची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 6:23 PM

लॉकडाऊनमुळे अर्जदारांची संख्या घटली

एप्रिल महिन्यात ०.९० दशलक्ष ग्राहकांचा मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी)  सुविधेसाठी अर्ज

खलील गिरकर

मुंबई : लॉकडाऊन मुळे एमएनपी सुविधेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांच्या संख्येतही कमालीची घट झाला आहे.  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत एप्रिल महिन्यात 0.90 दशलक्ष ग्राहकांनी मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी)  सुविधेसाठी अर्ज केला. मार्च महिन्यात 23 मार्च पासून लॉकडाऊन सुरु झाल्याने देशात 5.78 दशलक्ष ग्राहकांनी या सुविधेसाठी अर्ज केले होते. सन 2010 मध्ये या सुविधेला प्रारंभ झाल्यापासून मार्च पर्यंत 487.33 दशलक्ष ग्राहकांनी ही सेवा वापरली होती. एप्रिल 2020 पर्यंत 488.23 दशलक्ष ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला. 

देशात एप्रिल पर्यंत 1169.44 दशलक्ष दूरध्वनी ग्राहक आहेत त्यामध्ये वायरलेस सुविधा वापरणाऱ्यांचे प्रमाण 1149.52 दशलक्ष आहे तर वायरलाईन वापरणाऱ्यांचे प्रमाण 19.92 दशलक्ष आहे. नागरी भागातील 647.19 दशलक्ष असून ग्रामीण भागातील 522.24 दशलक्ष ग्राहक आहेत.  एकूण शहरी ग्राहकांच्या संख्येत मार्च महिन्याच्या तुलनेत 0.72 % घट नोंदवण्यात आली आहे. तर ग्रामीण ग्राहकांच्या संख्येत 0.14 % वाढ झाली आहे. देशात 676.14 दशलक्ष ब्रॉडब्रँड ग्राहक नोंदवण्यात आले आहेत.

 देशाच्या दूरसंचार घनतेमध्ये देखील घट झाली आहे. मार्च महिन्यात दूरसंचार घनता 87.37 टक्के होती त्यामध्ये घट होऊन एप्रिल मध्ये ही घनता 86.66 झाली आहे. ग्रामीण भागातील दूरसंचार घनता वाढली आहे. मार्च महिन्यातील 58.79 वरुन ही घनता एप्रिल महिन्यात 58.85 झाली आहे. शहरी भागातील दूरसंचार घनतेमध्ये मात्र घट नोंदवण्यात आली आहे. ही घनता मार्च महिन्यातील 142.31 वरुन एप्रिल महिन्यात 140.06 झाली आहे.  देशात सर्वात जास्त दूरसंचार घनता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये 276.93 इतकी आहे. तर, सर्वात कमी घनता बिहार मध्ये 52.41 इतकी नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्राची घनता 106.42 टक्के आहे. 

टॅग्स :मोबाइलडिजिटलतंत्रज्ञान