‘मार्ड’चा संप मिटला; बाह्यरुग्ण सेवा पूर्ववत, मागण्या मान्य करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 05:54 AM2021-12-07T05:54:23+5:302021-12-07T05:54:36+5:30

राज्य शासनाने डॉक्टरांसाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मार्डच्या सदस्यांनी समाधान व्यक्त करून समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन मागे घेतले.

‘Mard’ strike ended; Outpatient services will undo, accept demands | ‘मार्ड’चा संप मिटला; बाह्यरुग्ण सेवा पूर्ववत, मागण्या मान्य करणार

‘मार्ड’चा संप मिटला; बाह्यरुग्ण सेवा पूर्ववत, मागण्या मान्य करणार

Next

मुंबई : देशाबरोबरच मुंबईमध्येही ओमायक्रॉन या नवीन विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत असतानाच शीव येथील शासकीय रुग्णालयाबाहेर ‘मार्ड’च्या निवासी डाॅक्टरांनी सोमवारी सकाळपासून संप पुकारून बाह्यरुग्ण सेवा बंद केली होती. मात्र, राज्यातील निवासी डॉक्टरांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिल्यानंतर ‘मार्ड’ने संप मिटल्याची घोषणा केली. 

निवासी डॉक्टरांच्या विभागाशी निगडित व महानगरपालिकेच्या अखत्यारीतील समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडील विषयांबाबतही पाठपुरावा करण्यात येईल. आरोग्यसेवेसाठी ज्या आवश्यक बाबी आहेत त्या चांगल्या दर्जाच्या देण्याबाबत शासन आग्रही आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर मार्डने आंदोलन करू नये, असे आवाहन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, मुंबईतील महापालिकेच्या महाविद्यालयांचे अधिष्ठाता, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि मार्डचे सदस्य उपस्थित होते.

राज्य शासनाने डॉक्टरांसाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मार्डच्या सदस्यांनी समाधान व्यक्त करून समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन मागे घेतले. संप मागे घेतल्यानंतर सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले, राज्य शासनाकडून मनुष्यबळ वाढविण्याची ग्वाही देण्यात आली आहे. नीट, पीजी समुपदेशनही तातडीने नियोजित करून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची राज्य शासन केंद्राला विनंती करणार आहे. पालिका प्रशासनाने म्हाडा वसतिगृहांना मुदतवाढ देण्याचे मान्य केले आहे. मासिक वेतनही नियमन करण्याचे आश्वासित केल्याचे सांगितले.

बाह्य रुग्णसेवेतील रुग्णसंख्येत घट 
आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी निवासी डॉक्टरांनी बाह्यरुग्ण सेवा बंद केल्याने या विभागात नियमित उपचार घेण्यास येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. केईएम, सायन आणि नायर या पालिका रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण सेवा विभागात कायमच रुग्णांची वर्दळ दिसून येते. मात्र, सोमवारी यात ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली. मात्र, सोमवारी सायंकाळी उशिरा संप मिटल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

 

Web Title: ‘Mard’ strike ended; Outpatient services will undo, accept demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MARDमार्ड