Join us

मार्डने घेतली वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट

By admin | Published: February 09, 2017 2:41 AM

वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर निवासी डॉक्टरांना पूर्ण करावा लागणारा एक वर्षाचा बाँड, क्षयरोग झाल्यास भरपगारी रजा मिळणे

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर निवासी डॉक्टरांना पूर्ण करावा लागणारा एक वर्षाचा बाँड, क्षयरोग झाल्यास भरपगारी रजा मिळणे, प्रसूतीसाठी निवासी डॉक्टरांना रजा मिळणे, फ्री शिफ्ट अशा एकूण १० प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेच्या (मार्ड) पदाधिकाऱ्यांची वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर बैठक झाली. बैठक सकारात्मक झाली असली, तरीही लेखी स्वरूपात काही मिळाले नसून, आश्वासने मिळाले असल्याचे मार्डच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या काही वर्षांत निवासी डॉक्टरांना क्षयरोगाची लागण झाल्याच्या घटनांमध्ये थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे, पण क्षयरोग झाल्यावर निवासी डॉक्टरांना सुट्टी मिळत नाही. प्रसूतीसाठी निवासी डॉक्टरांना रजा मिळत नाही, या प्रश्नांची चर्चा करताना लवकरच परिपत्रक काढण्यात येणार असून, रजा मंजूर होण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षारक्षक तैनात करण्यात यावे, याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. पदव्युत्तर शिक्षणानंतर देण्यात येणारा बाँड त्याच शाखेत देण्याची मागणीही मान्य होईल, असे आश्वासन मिळाल्याचे मार्डचे सचिव डॉ. स्वप्निल मेश्राम यांनी सांगितले. पुढच्या आठ दिवसांमध्ये फ्री शिफ्ट संदर्भात ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. याविषयी आधी काढण्यात आलेल्या परिपत्रकांचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निवासी डॉक्टरांच्या समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी एक सेल निर्माण करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवासी डॉक्टरांसाठी बायोमेट्रिक्स असू नयेत, अशी मागणी करण्यात आली होती. त्या वेळी निवासी डॉक्टरांना काही प्रमाणात सूट देण्यात येणार असल्याचे डॉ. स्वप्निल यांनी सांगितले. पुढच्या महिनाभरात लेखी स्वरूपात काही मिळाले नाही, तर पुढच्या गोष्टी ठरवण्यात येणार असल्याचे मार्ड पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)