मुंबई : आरोग्यविषयक माहिती इंटरनेटवर शोधणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे, मात्र अनेकदा इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती ही परिपूर्ण आणि अचूक नसते. त्यामुळे रुग्णांच्या जिवावर बेतू शकते. याविषयी जनजागृती करण्यासाठी आणि रुग्णांना योग्य ती माहिती मिळावी म्हणून मार्ड फेसबुकवरून रुग्णांच्या शंकेचे निरसन करणार आहेत. वैद्यकीय शास्त्रातील संकल्पना आणि लोकांच्या समजूतींमध्ये खूप तफावत असते. गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास मधुमेह होतो, असा अनेकांचा गैरसमज आहे. तर, वैद्यकीय शास्त्राप्रमाणे मधुमेह झाल्यावर गोड पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्यास हानिकारक ठरते, असे अनेक गैरसमज आहेत, असे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. फेसबुकवर मार्डचे एक पेज आहे. या पेजवर रुग्णांनी प्रश्न विचारल्यास डॉक्टर शंकानिरसन करणार आहेत. ‘ट्रस्ट युवर डॉक्टर, नॉट विकिपिडीया’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासंदर्भात ४०० जणांशी संवाद साधण्यात आला होता. ४०० पैकी ३२० जणांनी आरोग्यविषयक प्रश्नांसाठी एकदातरी इंटरनेटवर सर्च केले असल्याचे सांगितले. ११० जण आरोग्याविषयक समस्यांसाठी नेहमीच इंटरनेटचा आधार घेत असल्याचे निदर्शनास आले. ५६ जणांनी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे औषधोपचार स्वत:च केले. त्यापैकी १२ जणांना औषधाचे साईड इफेक्ट्स भोगावे लागले. त्यामुळेच मार्डने ही मोहीम हाती घेतली आहे, असे डॉ. मुंदडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मार्डचे फेसबुक पेज रुग्णांच्या मदतीला
By admin | Published: January 04, 2016 1:34 AM