लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर दादर येथील फूल बाजार झेंडू व अन्य फुलांनी बहरला आहे. बाजारात फुलांची आवक वाढल्याने भावही आटोक्यात आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच झुंबड उडाली.
नवरात्रोत्सव आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी होणारे सरस्वती पूजन, शस्त्र पूजन यासाठी तसेच सजावटीसाठी, घराला तोरण म्हणून झेंडूच्या फुलांचा मोठा वापर केला जातो; त्यामुळे झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांना खूप मागणी असते. दादरच्या फूल बाजारात राज्यातील विविध भागांतून तसेच परराज्यातून लाखो टन फुलांची आवक होते.
गेल्या दोन दिवसांपासून भगवा, पिवळा, कोलकाता, नामधारी झेंडू, कापरी झेंडू मोठ्या प्रमाणावर विक्रीला आला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात झेंडूचे भावही तुलनेत कमी आहेत. गणेशोत्सव सणाच्या काळात फुलांचे भाव वधारले होते.
झेंडू बरोबरच शेवंती, गुलछडी, अष्टर, बिजली तसेच मोगरा, जाई, जुई, चमेली या सुवासिक फुलांना मागणी होती. या फुलांची आवक तुलनेने कमी होती. त्यामुळे घाऊक बाजारात १३०० ते १४०० रुपये किलोचा दर या फुलांना मिळाला आहे. त्याचबरोबर आपट्याच्या पानांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे पाहायला मिळाले.
दसऱ्याला घरातील सर्व प्रकारच्या वस्तूंची, साहित्यांची, शस्त्रांची पूजा केली जाते. त्याकरिता, तसेच सजावटीसाठी झेंडू व अन्य फुलांची खरेदी होते. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. - अण्णा कदम, व्यापारी.