लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका फुलव्यवसायालादेखील बसलेला दिसून येत आहे. ऐन शुभमुहूर्ताच्या काळातही फुल बाजारातील खरेदी मंदावल्याचे चित्र मुंबईत सर्वत्र दिसून येत आहे. यामुळे फुल विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दर वर्षी ८० ते १०० रुपये किलो या दराने विकला जाणारा झेंडू आता थेट २५ रुपये किलो या दराने विकला जात आहे.
लॉकडाऊनमुळे लग्नसमारंभ, पूजा तसेच इतर कार्यक्रम रद्द झाले आहेत. यामुळे बाजारात फुलांची मागणी देखील घटली आहे. तसेच ग्राहकांनी फुलबाजाराकडे पाठ फिरवली आहे. यामुळे विक्रेत्यांना नाइलाजास्तव फुलांचे दर कमी करावे लागले आहेत.
पुणे, सांगली, सातारा व नाशिक अशा महाराष्ट्राच्या विविध भागातून दादर फुल मार्केट मध्ये शेतकरी आपली फुले घेऊन येतात. यंदा बाजारात दाखल झाली असली तरीदेखील मागणी अत्यंत कमी असल्याने शेतकरी व व्यापारी ना नफा ना तोटा या उद्देशाने फूल विक्री करत आहेत.
दादाभाऊ येणारे (संस्थापक संचालक, दादर फुल बाजार) - कोरोनामुळे फुल व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अक्षय तृतीयेला दरवर्षी फुलांची मोठी मागणी असते. मात्र यंदा लग्न सोहळे, पूजा तसेच अनेक कार्यक्रम रद्द झाल्याने फुलांना अजिबात मागणी नाही. दादरच्या फुलबाजारात यंदा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी देखील नव्हती. दरवर्षीच्या तुलनेत केवळ १५ टक्के ग्राहकांनीच फुल खरेदी केली. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात फुलांची लागवड केली. त्यावेळी शेतकऱ्यांना लॉकडाउन होईल असे वाटले देखील नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी फुलांची लागवड केली मात्र आता त्या फुलांना बाजारच नाही. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पीक घेतले आहे. त्यांचा निदान लागवडीचा खर्च तरी निघावा या उद्देशाने ना नफा ना तोटा या उद्देशाने आम्ही आमची दुकाने केवळ शेतकऱ्यांसाठी सुरू ठेवली आहेत. दर वर्षी झेंडूच्या फुलांना बाजारात ८० रुपये किलो एवढा दर असतो मात्र आता ग्राहकच नसल्याने आम्हाला २५ रुपये किलो या दराने झेंडू विकावा लागत आहे.
अक्षय तृतीयेच्या दिवशी फुलांचे दर
पिवळा गोंडा - २५ रुपये किलो
कलकत्ता गोंडा - ३० रुपये किलो
गुलछडी - १०० रुपये किलो लीली - १०० रुपये १ हजार नग
गुलाब - ४० रुपये बंडल
शेवंती - १०० रुपये किलो
बिजली - १०० रुपये किलो