मुंबई : येरवडा कारागृह, डोंगरी बालसुधारगृहातील ड्रग्ज तस्करीच्या घटना ताज्या असतानाच मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात पोलिसाकडूनच कैद्याला ड्रग्जचे कॅप्सूल पुरवले जात असल्याचे उघडकीस आले आहे. संशयाच्या घेऱ्यात अडकलेल्या पोलिस हवालदाराच्या अंतर्वस्त्रातून ७० ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. कारवाई सुरू असताना पोलिसाच्या हाताचा चावा घेत त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवित हवालदाराला अटक केली. विवेक दत्तात्रय नाईक असे अटक झालेल्या पोलिसाचे नाव आहे. नाईक हा गेल्या दोन वर्षांपासून आर्थर रोड कारागृहात कर्तव्यासाठी तैनात आहे. ६ ऑक्टोबर रोजी रात्रपाळी असल्याने सायंकाळी ५ वाजता तो कर्तव्यावर हजर राहण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर आला. त्यावेळी हवालदार दीपक सावंत यांना नाईकच्या हालचालींवर संशय आला. त्यामुळे त्यांनी त्याची अंगझडती घेण्यास सुरुवात केली. मात्र, नाईकने विरोध केल्याने संशय बळावला. अखेर त्याच्या अंतर्वस्त्रात लपवून ठेवलेल्या एका प्लॅस्टिक पिशवीत ७० ग्रॅम चरसचे ७ कॅप्सूल आढळले.
तळोजा कारागृहात सापडले होते पैसे नाईक तळोजा कारागृहात असताना त्याच्याकडे काही पैसे सापडले होते. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार, त्याच्यावर पाळत ठेवून ही कारवाई करण्यात आल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
पाच दिवसांची पोलिस कोठडीराहुल नावाच्या व्यक्तीने हे चरस त्याला दिले असून, अतिसुरक्षा सर्कल २ मधील आरोपी राशीद याला देण्यासाठी सांगितले, अशी कबुली नाईक याने चौकशीदरम्यान दिली. त्यानुसार, दीपक सावंत यांच्या फिर्यादीवरून एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून नाईक याला न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
डोंगरी बालसुधारगृहाच्या भिंतीपलीकडून ड्रग्ज डोंगरी बालसुधारगृहाच्या भिंतीवरून मुलांना बिनधास्तपणे ड्रग्ज पुरवठा होत असल्याचे जून महिन्यात एका कारवाईतून समोर आले होते. या मुलांकडे गांजासह ब्लेड, मोबाइलही मिळून आला होता. त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळीकडून एका कॉलवर हे उपलब्ध झाले होते.