Join us

मरिन ड्राइव्ह अपघात प्रकरण; चॉकलेट खाण्यासाठी बाहेर पडले अन् मित्राला गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 7:19 AM

पाच मित्रांनी एकत्र भेटून चॉकलेट खाण्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणे भेटही झाली. गप्पा उरकून घराकडे परततत असताना रस्ता मोकळा पाहून त्यांच्यात रेसिंग सुरू झाली आणि हाच रेसिंगचा थरार एका मित्राच्या जीवावर बेतला

मुंबई : लॉकडाउनच्या काळात बरेच दिवस मित्रांपासून लांब राहिल्याने, पाच मित्रांनी एकत्र भेटून चॉकलेट खाण्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणे भेटही झाली. गप्पा उरकून घराकडे परततत असताना रस्ता मोकळा पाहून त्यांच्यात रेसिंग सुरू झाली आणि हाच रेसिंगचा थरार एका मित्राच्या जीवावर बेतला, तर एक जण मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती मरिन ड्राइव्ह अपघात प्रकरणांतून समोर आली आहे. यात तीन मित्रांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले.           कफपरेड येथील मेकर टॉवर मध्ये राहणारे वेदान्त मनोज पटोडिया (२१) आणि कुश दीपेश ढोलकिया (१८) यांच्याविरुद्ध एक तर सुनिता को. आॅप. सोसायटीत राहणारा रिषिक सुरेश गुप्ता (२०) विरुद्ध दुसरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भरधाव वेगाने वाहन चालविणे, रोगाचा प्रादुर्भाव होईल, असे कृत्य तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८८ अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले. तिघेही शिकत आहेत.             तिघांच्या जबाबातून समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी आर्यमन राजेश नागपाल (१८), शौर्यसिंग जैन (१९) यांच्यासह कुश, वेदान्त आणि रिषिकने चॉकलेट खाण्यासाठी एकत्र जमायचे ठरवले. त्यानुसार तीन कारमध्ये ही मंडळी मरिन ड्राइव्ह येथे एकमेकांना भेटली. तेथे बराच वेळ घालवल्यानंतर सायंकाळी घरी परतत असताना, रस्ता मोकळा पाहून रेसिंग करत ते सुसाट निघाले. याच वेगात शौर्यसिंगचे कारवारील नियंत्रण सुटल्याने कारची बसला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात आर्यमनचा जागीच मृत्यू झाला तर शौर्यसिंगची प्रकृती चिंताजनक आहे. मित्रांनीच त्यांना रुग्णालयात नेले.या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी शौर्यसिंगविरुद्ध निष्काळजीपणे भरधाव वाहन चालविणे, मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. त्यापाठोपाठ घटनास्थळी अन्य दोन कारबाबत समजताच अन्य मित्रांवरही गुन्ह्याची नोंद केली. 

टॅग्स :अपघातमुंबई