मरिन ड्राइव्हचे रूपडे लवकरच पालटणार; पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 11:10 AM2023-05-02T11:10:12+5:302023-05-02T11:10:45+5:30
या पर्यटकांना, तसेच या परिसरात विरंगुळा म्हणून भेट देणाऱ्या मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
मुंबई - मरिन ड्राइव्ह परिसरात देश-विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रशासनाला दिल्या आहेत. मरिन ड्राइव्ह परिसरातील विविध सुविधा, स्वच्छता व सुशोभीकरण कामांचा आढावा घेणारा पाहणी दौरा मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी केला. या परिसरात पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांची, तसेच उपाययोजनांची माहिती महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी कोस्टल रोडचीही पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
या पर्यटकांना, तसेच या परिसरात विरंगुळा म्हणून भेट देणाऱ्या मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. मरिन ड्राइव्ह परिसरातील सी फेसिंग इमारतींना विशिष्ट रंग देण्यात यावा, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो या ठिकाणी सुरू करावा, असे सांगत सध्या सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांच्या आणि स्वच्छतेच्या अनुषंगानेही त्यांनी विविध सूचना केल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महिला बालविकास आणि पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा उपस्थित होते.
सी साइड प्लाझा आणि आसन व्यवस्था
मरिन ड्राइव्हमध्ये पर्यटनाच्या अनुषंगाने एक व्ह्युविंग डेक (सी साइड प्लाझा) तयार करण्यात येत असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. व्ह्युविंग डेक निर्मिती ही नियोजन विभागाकडून केली जाणार आहे. एकूण ५३ मीटर लांब व ५ मीटर रुंद असा सी साइड प्लाझा नागरिकांना चालण्यासाठी, तसेच समुद्र पाहण्यासाठी जेट्टीच्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले. मरिन ड्राइव्ह परिसरात समुद्राच्या दिशेने (सी फेस) आसन व्यवस्था रचना येत्या काही दिवसांत करण्यात येणार असून, त्यामुळे पर्यटकांना समुद्र पाहण्यासाठी चांगली, सुखकर जागा मिळेल. त्या दृष्टीने कामाला सुरुवात करण्यात येत आहे, असेही आयुक्त चहल यांनी नमूद केले.
एक किलोमीटर अंतरावर स्वच्छतागृह
मरिन ड्राइव्ह परिसरात येणारे नागरिक आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर उत्कृष्ट दर्जाचे स्वच्छतागृह उभारण्यात यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. त्यावर खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व सहभागाने (सीएसआर) दोन स्वच्छतागृह उभारण्यात येतील.