देशाच्या आर्थिक उलाढालीत सागरीक्षेत्राचा मोठा वाटा : हेमंत महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:05 AM2021-04-06T04:05:52+5:302021-04-06T04:05:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशाच्या आर्थिक उलाढालीत सागरीक्षेत्राचा मोठा वाटा आहे. भारताला लाभलेल्या सागरी संपदेचे रक्षण करण्यासाठी व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशाच्या आर्थिक उलाढालीत सागरीक्षेत्राचा मोठा वाटा आहे. भारताला लाभलेल्या सागरी संपदेचे रक्षण करण्यासाठी व त्यातून होणाऱ्या व्यापरामार्फत देशाच्या आर्थिक उलाढालीत भर टाकण्यासाठी विविध लोक कार्यरत आहेत. यात विविध सुरक्षा दलांबरोबरच मर्चंट नेव्हीही कार्यरत आहे. त्यात पाहणी कर्मचारी, संशोधक, ओशनोग्राफर, संलग्न व्यावसायिक अशा एक लाख भारतीयांचा समावेश आहे. भारताला तीनही बाजूने लाभलेल्या समुद्रामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी भर पडत आहे, असे मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने रविवारी आयोजित ऑनलाइन व्याख्यानात मांडले.
जलवाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांना राष्ट्रीय मॅरिटाइम दिनानिमित्त महाजन यांनी मानवंदना दिली. ते पुढे ते म्हणाले की, जगामध्ये मर्चंट नेव्हीत १६ लाखांपेक्षा अधिक लोक काम करतात. भारतीय जहाजांद्वारे १० ते १२ टक्के व्यापार होतो, तर भारताच्या व्यापारासाठी त्यापेक्षा पाच पट अधिक जहाजे लागतात. त्यातून ९० टक्के व्यापार हा अन्य देशांच्या जहाजातून होत असतो. या क्षेत्रातील एकंदर जिकिरीचे असे काम पाहाता, ५ एप्रिल या राष्ट्रीय मॅरिटाइम दिनानिमित्त त्यातील व्यक्तींना खास सलाम करावा लागेल.
या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना माेठे नुकसानही सहन करावे लागते. विशेष करून सागरी चाच्यांकडून जगभरात होणारे जहाजांवरील हल्ले, अपहरणे, त्यांच्याकडून होणारे कर्मचाऱ्यांचे मृत्यू ही बाब गंभीर आहे. अलीकडेच केंद्राने उघड केलेल्या माहितीनुसार गतवर्षात चाचेगिरीची २६७ प्रकरणे आढळली, त्यामधील १८८ घटना रोखण्यात यश आले, तर ७९ घटना रोखण्यात यश मिळू शकले नाही. अनेक भारतीय सोमालियन चाच्यांच्या ताब्यात असून, त्यांच्या हल्ल्यात काही जखमीही झाले होते, काहींना प्राण गमवावे लागले. भारताची १४०० जहाजे असून, त्यांच्याकडून १७ ते १८ दशलक्ष टन इतकी वाहतूक होत असते. मात्र त्या तुलनेत आपला व्यापार अधिक असल्याने परदेशी मालकीच्या जहाजांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आपल्याला जहाज बांधणी क्षेत्रात गती आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
..............................