मुंबई : होळी आणि रंगपंचमीसाठी सध्या मुंबई सज्ज झाली असून, बाजारपेठा पिचकाऱ्या आणि रंगपंचमीच्या रंगांनी बहरून गेला आहे. बाजारपेठांत रंगीबेरंगी अशा रंगांची उधळण होत असून, रंगांच्या खरेदी-विक्रीला उधाण आले आहे. मात्र राज्यावर दुष्काळाची छाया असल्याने मुंबईकरांनी पाण्याची बचत करण्याच्या उद्देशाने पिचकाऱ्या आणि ओल्या रंगांकडे पाठ फिरवली आहे.मुंबई शहर आणि उपनगरातील बाजारपेठांमध्ये रंगपंचमीसाठी पिचकाऱ्या आणि विविध प्रकारचे रंग पाहायला मिळत आहेत. पिचकाऱ्यांमध्ये स्पंज बॉब, पिकाचु, मिनीयॉन्स, बार्बी या कार्टून आकारांच्या पाठीवर घ्यायच्या पिचकाऱ्या अनेक लहानग्यांना आकर्षित करत आहेत. या पिचकाऱ्यांचे दर ३५० ते ५०० रुपये आहेत. यासोबतच मोठमोठ्या बंदुकांच्या आकाराच्या पिचकाऱ्याही अनेकांना आकर्षित करत आहेत. या पिचकाऱ्यांचे दर ३०० ते ४०० रुपये आहेत. पारंपरिक आकाराच्या पण थोडासा नवा लूक दिलेल्या पिचकाऱ्याही पाहण्यास मिळत असून, या पिचकाऱ्यांवर डोरेमॉन, निंजा हातोडी या काटूर्नची चित्रे आहेत. तळहाताएवढ्या आकारांपासूनच्या पिचकाऱ्यादेखील आवर्जून खरेदी केल्या जात असून, त्यांची किंमत ३० रुपये आहे. यंदा इकोफ्रेंडली रंगांकडे अनेकांचा कल आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी सुगंधित पिठुळ रंग उपलब्ध करून दिले आहेत. गडद रंगापेक्षा सहज निघतील, असे फिकट रंगही खरेदी केले जात आहेत. (प्रतिनिधी)> लहान वयातच मुलांना तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन लागते. पुढे जाऊन हे व्यसन वाढते. तंबाखू खाणे, धूम्रपान करणे अशा व्यसनांमुळे भावी पिढीचे आरोग्य धोक्यात आहे. अनेकांना लहान वयातच कर्करोग गाठत आहे. याला आळा घालण्यासाठी होळीच्या निमित्ताने राज्याच्या नशाबंदी मंडळातर्फे व्यसनांचे दहन करण्यात येणार आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपात तंबाखूजन्य पदार्थांचा ८ फुटी राक्षस सीएसटी परिसरात उभा करण्यात येणार आहे.तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊ नये म्हणून नशाबंदी मंडळ विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. होळीच्या दिवशी वाईट प्रवृत्तीचे दहन करायचे असते. म्हणून मंडळातर्फे ‘करून होलिकेला नमन, करुया व्यसनांचे दहन’ याचा प्रचार, प्रसार केला जाणार आहे. व्यसनी व्यक्तींच्या आरोग्यावर परिणाम होतोच. पण त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांवरही याचा परिणाम होतो. हे दाहक सत्य लोकांसमोर आणण्यासाठी मंडळातर्फे २२ मार्च रोजी दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सीएसटी येथील कॅपिटल सिनेमासमोरील १३८ च्या बसथांब्यावर हा कार्यक्रम होणार आहे. येथे तंबाखूजन्य पदार्थांचा राक्षस बनविला जाणार असून त्यावर गुटखा, सिगारेट, अमली पदार्थ यांची वेष्टणे लावून राक्षसाला प्रतीकात्मक जाळण्यात येईल आणि होळीला साक्षी ठेवून आयुष्यभर निर्व्यसनी राहण्याचाही संकल्प केला जाणार असल्याचे मंडळाच्या सरचिटमविलास यांनी सांगितले.