मुंबई : सगळ्यांचं स्टेटस सिम्बॉल असलेली वस्तू म्हणजे लेदर. पर्स, शूज, पट्टे, वॉलेट्स असं सारं काही चामड्याचं वापरायची काहींना सवय असते. पण सध्या चामड्याच्या वस्तूतही भेसळ झाल्याने शुद्ध चामड्याच्या वस्तू मिळणं दुरापास्त झालंय. पण मुंबईतील एका ठिकाणी तुम्हाला अस्सल चामड्याच्या वस्तू आजही मिळू शकतील. आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून आपण धारावीकडे पाहतो. झोपडपट्टीतील लोकसंख्या ज्याप्रमाणे वाढत गेली त्याचप्रमाणे इथं लघुउद्योगांची संख्याही वाढत गेली. इथं वेगवेगळ्या प्रकारचे लघुउद्योग पहायला मिळतात. त्याचप्रमाणे धारावीत चामड्यांचा उद्योगही मोठ्या प्रमाणात पाहयाल मिळतो. धारावीला चर्मकारांचा बालेकिल्ला असंही म्हणतात. मात्र गेल्या काही वर्षांत इथं परप्रांतीयांनी आक्रमण केल्याने मुळचे चर्मकार आता मागे राहिलेत. मात्र तरीही चामड्यांच्या वस्तूंसाठी आजही मुंबईकर धारावीला आवर्जून भेट देतात.
सायन स्थानकातून पूर्वेला बाहेर पडलात की समोरच चामड्यांच्या दुकानांची रांग लागलेली पाहयला मिळते. जवळपास १५० ते २०० दुकानांच्या रांगा तुम्ही पाहू शकाल. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये इथं चामड्याच्या वस्तू मिळू शकतील. गेल्या ६० ते ७० वर्षांपासून चर्मोद्योग इथं सुरू आहे. पूर्वी साप, मगर, वाघ यांच्या कातडीपासून वस्तू तयार केल्या जायच्या. मात्र सध्या यांच्या शिकारीवर निर्बंध आल्यावर इतर प्राण्यांच्या कातडीपासून वस्तू तयार केल्या जातात. त्यालाच टेनरी असं म्हणतात.
आणखी वाचा - मुंबईतील 'या' भयानक आणि झपाटलेल्या जागा माहितेयत का?
आणखी वाचा - एका दिवसाच्या मुंबई सफरीत ही ठिकाणं विसरु नका.
तुम्ही इथं फेरफटका मारलात की तुमच्या लक्षात येईल की इथं प्रत्येक दुकानात वेगवेगळी कामं सुरू असतात. पर्स, घड्याळाचा पट्टा, पुरुषाचं वॉलेट अशी वेगवेगळी दुकानं तुम्हाला दिसतील. असं म्हणतात की, एखादी वस्तू तयार करण्यासाठी कारागिराला बारा ते तेरा तास लागतात. कारण चामड्यावर जर चुकूनही कोणता डाग लागला की त्यावरचा तो डाग पुसणं अत्यंत अवघड असतं. त्यामुळे डोळ्यात तेल टाकून हे काम करावं लागतं. इथं तुम्हाला होलसेलच्या किंमतीत वस्तू मिळत असल्यानं बाहेरच्या किंमतीपेक्षा कितीतरी पटीने कमी किंमतीत खेरदी करू शकता. त्यामुळे अनेक परदेशी पर्यटकही इथं भेट द्यायला येत असतात.
पाहा फोटोज - स्ट्रीट शॉपिंगसाठी पुण्यातील ही ठिकाणं आहेत सर्वात लय भारी
गेल्या काही वर्षात चामड्याच्या वस्तूंच्या रचनेत अनेक बदल होत गेले. सुरुवातीला केवळ सारख्याच डिजाइनचे पर्स बनवले जायचे. मात्र कालांतराने या डिजाईनमध्ये फरक जाणवायला लागला. सुरुवातीला केवळ काळ्या किंवा चॉकलेटी रंगात चामड्याच्या वस्तू बनवल्या जायच्या. मात्र आता विविध रंगात अशा वस्तू मिळत असल्याने ग्राहकांचा ओघ आणखी वाढला आहे. बरं, इथं बनवण्यात येणारे चामड्याचे वस्तू केवळ स्थानिक किंवा मुंबईकरच विकत घेतात अशातला भाग नाही. तर, परदेशातही या वस्तूंची निर्यात केली जाते. जर्मनी,अमेरिका, इटली या देशात अशा वस्तूंना मोठी मागणी आहे. एवढंच नव्हे तर चामड्याच्या वस्तू तयार करण्यासाठी लागणारे सोल्यूशन, चेन, चपलांचे डनलॉप, एअर सोल, कॅनव्हॉस अशा सामानांची दुकानेही इकडं आढळतात. तसंच, इथे चामड्यांसोबत रेक्झिनच्या बॅगदेखील मिळतात. त्यामुळे चामड्याच्या वस्तू खरेदी करताना थोडीशी सावधानता बाळगा आणि खरेदी करा.