बाजाराची वाटचाल नवीन उच्चांकाच्या दिशेने
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 10:40 AM2021-06-28T10:40:01+5:302021-06-28T10:40:09+5:30
संवेदनशील निर्देशांकाने नवीन उंची गाठली आहे. निफ्टी नवीन उच्चांकापासून अवघा १० अंश दूर आहे. त्यामुळे आगामी सप्ताह हा नवीन उच्चांकाचा असू शकतो
प्रसाद गो. जोशी
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये होत असलेली सुधारणा, तेथील बेरोजगारीचा कमी झालेला दर याचा चांगला परिणाम गतसप्ताहामध्ये दिसून आला. संवेदशील निर्देशांकाने गाठलेला नवा उच्चांक आणि निफ्टीची त्याकडे सुरू असलेली वाटचाल हे सप्ताहाचे वैशिष्ट्य होय. गत सप्ताहात बाजार तेजीमध्येच राहिला. परकीय वित्तसंस्थांनी विक्री करून नफा कमावण्याचे धोरण ठेवले तरी बाजारात गुंतवणूकदार सक्रिय असल्याने बाजार
वाढला.
संवेदनशील निर्देशांकाने नवीन उंची गाठली आहे. निफ्टी नवीन उच्चांकापासून अवघा १० अंश दूर आहे. त्यामुळे आगामी सप्ताह हा नवीन उच्चांकाचा असू शकतो. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका, त्यामुळे लागू होऊ शकणाऱ्या विविध निर्बंधांची भीती, त्याचा अर्थव्यवस्थेवर होऊ शकणारा परिणाम, यामुळे बाजारावर काही प्रमाणात विक्रीचे दडपण येऊ शकते.
परकीय चलन गंगाजळीत घसरण
nदेशाच्या परकीय चलन गंगाजळीत संपलेल्या आठवड्यात ४.१४८ अब्ज डॉलरने घट होऊन ती ६०३.९३ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. डॉलर महागल्यामुळे परदेशातील मालमत्तेचे कमी झालेले मूल्य आणि सोन्याचा घसरलेला साठा यामुळे ही घसरण झाली. सप्ताहामध्ये परदेशातील मालमत्तेचे मूल्य ३.०७४ अब्ज डॉलरने कमी होऊन ६०८.०८१ अब्ज डॉलर झाले आहे.
nआगामी सप्ताहामध्ये महत्त्वाच्या घटना, घडामोडी नसल्याने कोरोनाबाबतच्या बातम्या, लसीकरणाची प्रगती आणि शेअर बाजारात घडणाऱ्या घडामोडी याच बाजारावर परिणाम करणाऱ्या ठरतील. परकीय वित्तसंस्थांकडून घेतली जाणारी भूमिका बाजारासाठी दिशादर्शक ठरू शकते.
सप्ताहातील कामगिरी
निर्देशांक बंद मूल्य बदल
सेन्सेक्स ५२,९२५.०४ ५८०.५९
निफ्टी १५,८६०.३५ ११७.००
मिडकॅप २२,५४९.६५ ३११.४४
स्मॉलकॅप २४,९९६.२३ ३४७.४०