Join us

नवरात्रौत्सवासाठी बाजार सजला, पारंपरिक पोशाखाला मुंबईकरांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 2:41 AM

घटस्थापनेला अवघे चार दिवस शिल्लक असून मुंबईकर नवरात्रौत्सवाच्या तयारीत व्यस्त आहेत. मुंबईतील सर्व लहान-मोठ्या बाजारपेठांमध्ये ‘राजस्थानी’ घागरा-चोली घेण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडत आहे.

मुंबई : घटस्थापनेला अवघे चार दिवस शिल्लक असून मुंबईकर नवरात्रौत्सवाच्या तयारीत व्यस्त आहेत. मुंबईतील सर्व लहान-मोठ्या बाजारपेठांमध्ये ‘राजस्थानी’ घागरा-चोली घेण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडत आहे. लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत सर्वांसाठीच्या पारंपरिक घागरा-चोली बाजारात उपलब्ध आहेत.नवरात्रौत्सव म्हटला की, सर्वांसमोर दांडिया आणि गरब्याचे चित्र उभे ठाकते. त्यातही पारंपरिक घागरा-चोली घालून दांडिया किंवा गरबा खेळणे सर्व मुलींना आवडते. त्यामुळे पारंपरिक घागरा-चोलीसोबत डिझायनर आणि फॅशनेबल घागºयालासुद्धा तरुणींकडून पसंती दिली जात आहे.लहान मुलींसाठी २५० रुपयांपासून ते ६०० रुपयांपर्यंतचे घागरा-चोली उपलब्ध आहेत. तर मोठ्या मुलींसाठी ८०० रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंत किमतीच्या घागरा-चोली दादर आणि कुर्ला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.तर मुलांसाठी पारंपरिक गुजराती धोती आणि जॅकेट्ससह टोप्यासुद्धा बाजारांमध्ये उपलब्ध आहेत. मोठ्या मुलांसाठीचे हे कपडे मोठ्या प्रमाणात नसले तरी लहान मुलांसाठीचेधोती, सदरे उपलब्ध आहेत. २५० ते ५०० रुपये त्यांची किंमत असून बच्चेकंपनी अशा रंगीबेरंगी धोती आणि सद-यांसाठी हट्ट करत असल्याचे चित्र दादर मार्केटमध्ये पाहायला मिळाले.रंगीबेरंगी साड्या : अनेक महिला नवरात्रीत नऊ रंगांच्या साड्या नेसतात. अशा महिलांसाठी विविध रंगांच्या साड्यांचे स्टॉल्स बाजारांमध्ये लागले आहेत. अशा स्टॉल्सची संख्या गेल्या काही दिवसांत वाढलेली आहे. कमी किमतीत अशा रंगीबेरंगी साड्या दादर आणि कुर्ला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. दोन-तीन साड्यांचे सेटसुद्धा उपलब्ध आहेत. महिलावर्गाला आकर्षित करण्यासाठी काही दुकानदारांकडून ‘नवरात्री विशेष’ आॅफरसुद्धा दिल्या जात आहेत.