नववर्षाच्या स्वागताला बाजारपेठ सज्ज!

By admin | Published: March 27, 2017 06:57 AM2017-03-27T06:57:24+5:302017-03-27T06:57:24+5:30

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याला नवीन वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा

Market ready to welcome new year! | नववर्षाच्या स्वागताला बाजारपेठ सज्ज!

नववर्षाच्या स्वागताला बाजारपेठ सज्ज!

Next

नववर्षाच्या स्वागताला बाजारपेठ सज्ज!

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याला नवीन वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल पाहता विविध आॅफर्ससह बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. रविवारी दादर, परळ येथील फुलमार्केट झेंडूच्या फुलांच्या माळा-तोरणांनी भरलेले दिसून आले. तसेच वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करण्यापासून ते शोभायात्रेची तयारी करून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण जोरदार तयारी करतानाचे चित्र होते.
गुढीपाडव्यासाठी दोन दिवसांपासून रंगीबेरंगी साखरेच्या गाठ्यांनी बाजारपेठ रंगून गेली आहे. शहरातील प्रसिद्ध मिठाईच्या दुकानांमध्ये श्रीखंड, आम्रखंड, चक्का, पुरणपोळी असे विविध प्रकारचे गोडाधोडाचे पदार्थ तयार आहेत. आजच्या धावपळीच्या जगात पारंपरिक चक्क्यालाही प्रचंड मागणी असल्याचे निरीक्षण प्रकाश सामंत यांनी नोंदवले. गेल्या आठवडाभरात सोने-चांदीच्या खरेदीसाठी सराफांच्या दुकानांतील गर्दी वाढलेली दिसून आली.
दुचाकी, चारचाकी, वातानुकूलित यंत्रणा, फर्निचर विक्रीसाठी कंपन्यांकडून १०० टक्के अर्थसाहाय्यासह काहींनी शून्य टक्के व्याजदराच्या स्कीम जाहीर करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक वर्ष संपत असताना वाहन विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास दुचाकी विक्रेत्या कंपन्या सज्ज झाल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शोरूमसमोर आकर्षक सजावट करून जाहीर केलेल्या योजना ग्राहकांच्या चटकन नजरेस पडतील याची काळजी घेतली जात आहे.
ग्राहकांसाठी वाहन बाजाराप्रमाणे होम अप्लायन्सेस मार्केटही तेजीत आहे. तसेच, मोबाइल्स, टॅब्स, लॅपटॉप्स, एलईडी, फ्रीज, वातानुकूलित यंत्रणा खरेदी करणाऱ्यांना शून्य टक्के व्याजदर, वस्तू खरेदी केल्यावर त्यावर होम थिएटर, गॉगल्स यासह इतर वस्तू देण्याऱ्या आकर्षक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. कपड्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी शहरांतील मॉल्समध्ये गुढीपाडव्याच्या आधीपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. गुढीपाडवा आणि नववर्ष शोभायात्रा असे समीकरणच काही वर्षांपासून जुळून गेल्यामुळे शोभायात्रेतील वेगवेगळ्या विषयांवर चित्ररथांवर शेवटचा हात फिरवताना कार्यकर्त्यांची लगबग दिसून येत होती. (प्रतिनिधी)

छोट्या आकर्षक गुढ्या


गेल्या काही वर्षांपासून वर्षभर घरात ठेवण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या छोट्या-छोट्या गुढ्या आकर्षण ठरत आहेत. अनेक संस्था आणि व्यक्तींद्वारे या गुढ्या तयार केल्या जातात.
गिरगावातील भालचंद्र कल्याणकर यांच्या कुटुंबाने छोट्या सहा इंचाच्या गुढ्या तयार केल्या आहेत. गेली आठ वर्षे या प्रकारच्या गुढ्या तयार करत आहेत.
कल्याणकर यांनी तयार केलेल्या गुढ्या परदेशातही पाठवल्या जातात. काठीला साडीप्रमाणे गुंडाळलेला काठ आहे, त्यावर तांब्यापासून तयार केलेला तांब्या बसवला आहे.
या गुढीमध्ये लाल, पिवळा, हिरवा, जांभळा, भगवा असे रंग आहे. कल्याणकर यांनी अशा प्रकारच्या २०० गुढ्या तयार केल्या आहेत.

Web Title: Market ready to welcome new year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.