Join us  

बाजारपेठ, वाहतूक व्यवस्थाही डिजिटल...

By admin | Published: January 01, 2017 4:11 AM

पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. हाताशी असलेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आणि दैनंदिन कामासाठी

मुंबई : पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. हाताशी असलेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आणि दैनंदिन कामासाठी लागणाऱ्या पैशाची जमवाजमव करण्यासाठी बँकांसह एटीएमबाहेर मोठमोठ्या रांगा लागू लागल्या. परंतु आता हळूहळू बाजार स्थिरावतोय. याप्रमाणेच प्रवासासाठीही लोकांनी कॅशलेस पर्याय स्वीकारले आहेत. आठवडाभर धंदा ठप्प झाल्याने आता करायचे काय, असा प्रश्न साऱ्या विक्रेत्यांना पडला आहे. परंतु नोटांच्या चणचणीवर तोडगा काढत हातात कॅश घेऊन फिरण्यापेक्षा मोबाइलमधील अ‍ॅपमधून खरेदी करण्याला आता उधाण आले आहे. विशेष म्हणजे लहान दुकानदारही या अवगत तंत्रज्ञानाचा अवलंब करताना दिसत आहेत. कॅशलेश होणाऱ्या मुंबईच्या बाजारपेठांचा घेतलेला हा आढावा...चाय पिओ, पैसे फोनसे दो...दादर शिवाजी मंदिरजवळ संतोष शुक्ला यांची पानाची आणि चहाची टपरी आहे. कटिंग चहा पिण्यासाठी आणि पान खाण्यासाठी येथे गर्दी असते. कटिंग चहा साधारण ५ रुपये आणि पानाची किंमतही साधारण तेवढीच. पण ज्या दिवसापासून मोबाइलमधून पैसे आकारायला सुरुवात केली आहे त्या दिवसापासून दिवसातून ३ ते ४ लोक मोबाइलद्वारे पेमेंट करतात. डेबिट कार्ड स्वाइप मशीनपेक्षा हे जास्त सोपे आहे. आणि पैशाने भरलेल्या गल्ल्याची काळजीदेखील घ्यावी लागत नाही, असे शुक्ला यांनी सांगितले.अलंकाराची कॅशलेस खरेदी दादर म्हणजे खरेदीचे हब. दिवसाला कित्येक लोक येथे खरेदीसाठी येतात. विशेषत: रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून लोक अधिक खरेदी करतात. नोटाबंदीने साऱ्या बाजारपेठांवर परिणाम केला. याची झळ छोट्या दुकानदारांना अधिक बसली, असे सांगतात. दादर येथे अमित पाटील यांचे इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे. ते आणि त्यांच्या जवळ असलेल्या कपड्यांच्या दुकानमालकांनी एकत्रितपणे मोबाइलमधून पैसे स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कॉलेजच्या मुली दागिने घेतात आणि चटकन मोबाइलद्वारे पैसे देतात. दिवसाला किमान ५ ते ६ जण याचा वापर करतात. त्यामुळे पैशाचा हिशोब ठेवावा लागत नाही. विशेष म्हणजे आॅनलाइन भरलेली कॅश संपत आली म्हणून रोख देतात आणि ते पैसे मोबाइलमधून त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला सांगतात. लोकांना आता कॅश नेण्यापेक्षा हा पर्याय जास्त आवडू लागला आहे.प्रवासही ‘कॅशलेस’मुंबईकर कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देत आता ‘डिजिटल अर्थव्यवस्थे’कडे वळू लागले असून, यात मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेने बाजी मारली आहे. बेस्ट बस, लोकल, मेट्रो, रिक्षासह वाहतूक सेवा देणाऱ्या खासगी कंपन्या यात अग्रस्थानी आहेत. महत्त्वाचे म्हणजे वाहतूक व्यवस्थेने डिजिटल व्यवहारांना प्राधान्य दिल्यानंतर प्रवाशांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एकंदर मॉलसह उर्वरित साहित्याची खरेदी-विक्री आॅनलाइन होत असतानाच मेगासिटी म्हणून ओळखली जाणारी मुंबई नोटाबंदीनंतर आता खऱ्या अर्थाने डिजिटल होत असून, वाहतूक यंत्रणेसह उर्वरित यंत्रणांनीही आपला रोख कॅशलेससह डिजिटल होण्याकडे वळवला आहे.केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आणि रेल्वे, टॅक्सी, एसटीने कॅशलेस सेवेचा पर्याय त्वरित स्वीकारला. त्याला प्रवाशांकडूनही प्रतिसाद देण्यास सुरुवात झाली. नव्या वर्षात या सेवांनी पूर्णपणे ‘कॅशलेस’चे उद्दिष्ट ठेवले असून, कॅशलेसचे आणखी वेगवेगळे पर्याय देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून कॅशलेसचा पर्याय निवडण्यात आल्यानंतर सर्वप्रथम रेल्वे प्रशासनाने याकामी पुढाकार घेतला. मोठ्या प्रमाणात तिकिटांचा व्यवहार होत असल्याने रेल्वेतील आरक्षण केंद्रांवरच पीओएस मशिन बसवण्यास सुरुवात केली. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे तिकिटाचे शुल्क भरून तिकीट देण्यात येत असल्याने आणि रोख रकमेचा व्यवहार होत नसल्याने प्रवाशांनी पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. आरक्षण केंद्रांवर याची अंमलबजावणी झाल्यानंतर लोकल तिकीट खिडक्यांवरही या मशिन बसवल्या जात आहेत; आणि पास काढणाऱ्या प्रवाशांना सुविधा उपलब्ध केली जात आहे. रेल्वेच्या कॅशलेसला जास्तीतजास्त प्रतिसाद मिळावा यासाठी पासावर ०.५ टक्के सवलत १ जानेवारी २0१७पासूनही देण्याची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी, अधिकाधिक व्यवहार कॅशलेस होण्यास मदत होणार असून, भविष्यात रेल्वेबरोबरच एसटी, टॅक्सी सेवांही कॅशलेस होण्याच्या मार्गावर आहेत. मेंदी काढून घ्या, पैसे आॅनलाइन द्या...रमेश नायक यांचा भांडुप पश्चिमेकडे स्टेशनलगत मेंदीचा व्यवसाय आहे. दररोज काही महिला मंगलकार्यानिमित्त मेंदी काढण्यासाठी येथे येतात. नोटाबंदीनंतर त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे रमेश यांनी सांगितले. नेमके थंडीच्या दिवसांत विवाहसोहळे असतात. या वेळी मेंदी काढून घेण्यासाठी रांग लागते. ५० रुपयांपासून हातावर मेंदी काढून मिळते. नोटाबंदीनंतर काही दिवसांत २ हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध झाल्या खऱ्या; पण सुट्टे पैसे नसल्यामुळे अनेक ग्राहक परतत होते. त्यामुळे नायक यांनी आॅनलाइन पद्धतीने पैसे स्वीकारण्यास सुरुवात केली. आता आलेल्या प्रत्येकाला ते ‘मेंदी काढून घ्या, पैसे आॅनलाइन द्या,’ असे सांगतात. त्यामुळे दिवसाला किमान १५ ते २० ग्राहक मोबाइलद्वारे पैसे देतात. कॅशलेश झाल्याचा त्यांना हा फायदा झाला आहे.नारळाचे पेमेंटही मोबाइलवर...संतोष महाबरे यांचे भांडुप येथे पूजा साहित्याचे दुकान आहे. त्यांनीही मोबाइलद्वारे पैसे स्वीकारण्याची प्रणाली स्वीकारली आहे. पूजाविधीसाठी लागणारे साहित्य अगदी ५ रुपयांपासून सुरू होते. मध्यंतरी सुट्ट्या पैशांची समस्या असल्याने ग्राहक येथे कमी फिरकत होते. नोटाबंदीच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी काही साहित्य उधारीवरही दिले. परंतु ते तरी किती दिवस चालणार? म्हणून लागलीच मोबाइलमधून पेमेंट घ्यायला सुरुवात केली. आता येणाऱ्या ग्राहकाच्या हातात नोटा नसल्या की ते फोन काढून सरळ आॅनलाइन पेमेंट काही सेकंदांत करतात. १६ रुपयांचा नारळ घ्यायचा असेल तरी लोक फोन काढतात आणि पैसे देतात. आतातर ५ रुपयांचा अगरबत्तीचा पुडा घेण्यासाठी फोनमधील अ‍ॅपचा आधार घेतला जात आहे.