बाजार ४०० लाख कोटींचा! नऊ महिन्यांत १०० लाख कोटींनी वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 05:43 AM2024-04-09T05:43:58+5:302024-04-09T05:44:35+5:30
सार्वकालिक उच्चांक, नऊ महिन्यांत १०० लाख कोटींनी वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईशेअर बाजाराने नवा विक्रम प्रस्थापित केला. बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांमध्ये विक्रमी उसळी दिसून आली असतानाच बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे एकूण भांडवली मूल्य ४०० लाख कोटींहून अधिक झाले आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही जोरदार वृद्धी दिसून आली आहे.
बीएसई सेन्सेक्स आजवरच्या ७४,८६९ अंकांच्या सार्वकालिक उच्चांकी पोहोचला होता, तर निफ्टीही २२,६९७ अंकांच्या सर्वाधिक उंचीवर पोहोचला. सेन्सेक्स ४९४ अंकांच्या वृद्धीनंतर ७४,७४२ अंकांवर स्थिरावला, तर निफ्टी १५२ अंकांच्या वाढीनंतर २२,६६६ अंकांवर स्थिर झाला. बीएसईच्या ३० मधील २१ समभागांमध्ये वाढ तर ९ समभाग घसरले. बंधन बँकेचे शेअर्स ६.२१ टक्क्यांनी घसरले. बँकेचे सीईओ चंद्रशेखर घोष यांच्या राजीनाम्यानंतर ही घसरण झाल्याचे दिसून आले.
ऑटोमध्ये तेजी, आयटीची घसरण
nशेअर बाजारातील क्षेत्रीय इंडेक्सचा विचार केला असता ऑटोमध्ये सर्वाधिक २.१६ टक्क्यांची तेजी दिसून आली. रिअल्टीमध्ये १.३३ टक्के, ऑइल अँड गॅसमध्ये १.४५ टक्के, ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये ०.८३ टक्के वृद्धी दिसून आली.
nमीडियामध्ये ०.७७ टक्के आणि आयटीमध्ये ०.५२ टक्क्यांची घसरण दिसून आली. मागील आठवड्यात कारभाराच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी बाजारात किरकोळ वाढ दिसून आली होती.
११, १७ एप्रिलला बंद
चालू व पुढील आठवड्यात बाजारांचे कामकाज ५ ऐवजी ४ दिवसच होईल. सुट्यांमुळे २ दिवस बाजार बंद असेल. या आठवड्यात गुरुवार, दि. ११ एप्रिल रोजी ईद - उल - फितरच्या सुटीमुळे बाजार बंद राहील. पुढील आठवड्यात बुधवार, १७ एप्रिल रोजी रामनवमीच्या सुटीनिमित्त बाजार बंद राहील.