बाजारपेठा सजल्या
By admin | Published: September 16, 2015 03:25 AM2015-09-16T03:25:10+5:302015-09-16T11:48:24+5:30
अवघ्या काही तासांवर बाप्पाचे आगमन येऊन ठेपले असल्यामुळे शहर-उपनगरांतील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी एकच झुंबड उडाली आहे. गणपतीसाठी नवनवी आभूषणे घेण्याकडेही ग्राहकांनी
- लीनल गावडे , मुंबई
अवघ्या काही तासांवर बाप्पाचे आगमन येऊन ठेपले असल्यामुळे शहर-उपनगरांतील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी एकच झुंबड उडाली आहे. गणपतीसाठी नवनवी आभूषणे घेण्याकडेही ग्राहकांनी पसंती दर्शविल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे प्रदूषणाला आळा घालणाऱ्या इकोफ्रेंडली मखरांची मागणी वाढल्याने या मखरांमध्ये सहज आणि निरनिराळ््या प्रकारांच्या आरास पाहायला मिळत आहेत.
बाप्पाच्या आभूषणांसाठी शहर-उपनगरांतील लालबाग, दादर, मस्जीद, कुर्ला, बोरीवली, मालाड, अंधेरी अशा विविध बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. त्यात बाप्पांचा सगळ्यात सुंदर मानला जाणाऱ्या कंठी या दागिन्यातही विविधता पाहायला मिळते आहे. त्यात मोती, कुंदन, खडे यांची गुंफण करून बनवलेल्या कंठींना अधिक मागणी आहे. विशेष म्हणजे शाहीहार आणि डिझायनर दागिन्यांची आवड लक्षात घेऊन बाप्पासाठी वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांची खैरात आहे. अमेरिकन डायमंड्सचा वापर करून तयार करण्यात आलेले दागिने सोन्याहून अधिक चकाकतात़ त्यामुळे यंदा भाविकांनी अशा दागिन्यांनाही पसंती दर्शविली आहे. या दागिन्यांची किंमत ६० रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत आहे. बाप्पांच्या मुकुटांमध्ये फेटा स्टाईल मुकुटांना जास्त पसंती आहे. धातू, कापड अशा दोन प्रकारांमध्ये खडे, मोती, कुंदन, मोरपंख अशा सजावटींनी परिपूर्ण असलेल्या मुकुटांना अधिक मागणी आहे.
या मुकुटांची किंमत १५० रुपयांपासून आहे. याशिवाय बाप्पाच्या सोंडेसाठी, कानासाठी असणारे विशेष दागिने, तोडे, बाजूबंद, भीकबाळी, वाळे अशा आभूषणांनी मार्केट चकाकते आहे.
‘जोडो तोडो’च्या संकल्पनेतील हे मखर असल्यामुळे प्रवासात ने-आण करताना त्रासही होत नाही. लहान मुलेही मखर सहज जोडू शकतात. थर्माकॉलऐवजी हॅण्डमेड कागद आणि पुठ्ठ्यांचा वापर करून तयार केलेली मखरंही बाजारात आहेत. या मखरांच्या किमती ५०० ते ५० हजारांवर पोहोचल्या आहेत. याशिवाय खऱ्याखुऱ्या फुलांची सजावट केलेली मखरंही आहेत.
आॅर्कीडच्या फुलांनी कमानीत वेगवेगळ््या पद्धतीने सजावट केली जाते. या खऱ्या फुलांबरोबरच खोट्या फुलांचा वापर करून तयार केलेल्या कमानीदेखील बाजारात आहेतच.
मल्टिकलर, सिंगल कलरमध्ये उपलब्ध असलेल्या या कमानी वॉशेबल असल्यामुळे तुम्ही त्यांचा पुन्हा वापर करू शकता. या कमानींची किंमतही साधारणत: ५०० रुपयांपासून आहे.
बाप्पाच्या दागिन्यांची विविधता
कमरपट्टा, छत्र, तोडे, आसन, नारळ, केळे, बुगडी, कुंडल, त्रिशूल, चांदीचे ताट, भीकबाळी, कर्णफुले, जास्वंदीचे फुल, उंदीर, मोदक, कंठी, सोंडपट्टी, मुकुट, केळीचे पान, विड्याचं पान, दुर्वाहार, जास्वंदी हार, मोदक हार, शेला, उपरणं, बाजूबंद, केवड्याचे पान, कमळाचं फुल, वाळा, चांदीचा पाट, चौरंग, कलश, घंटी, चांदीची फळं, साखळी, उपरणं, कंठी, कान, भीकबाळी, परशू असे नानाविध प्रकारचे दागिने पाहायला मिळतील़
गौरीचे दागिने
दागिन्यांमध्ये गौरींसाठी कानातले, नथ, बांगड्या, तोडे, लक्ष्मीहार, कंबरपट्टा, मुकुट, ठुशी, मंगळसूत्र, वाकी, बोरमाळ असे अनेक दागिने खडे, मोती व सोनेरी अशा विविध प्रकारांत उपलब्ध आहेत. यामध्ये खड्यांच्या दागिन्यांची किंमत जास्त असून, त्यांच्या पूर्ण दागिन्यांच्या सेटची किंमत तीन हजारांपासून ते सहा हजारांपर्यंत आहे, तर मोत्यांच्या सेटची पाचशेहून अधिक आहे. दागिन्यांबरोबरच गौरीच्या साड्यांमध्ये नऊवारी व सहावारी साडी हे प्रकार बाजारात आहेत. या साड्यांची किंमत ३०० च्या पुढे आहे.