मुंबई : दिवाळीच्या खरेदीसाठीचा शेवटचा रविवार असल्याने काेराेनाची भीती न बाळगता मुंबईकरांनी विविध वस्तू ,कपडे खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली हाेती. पण यामुळे अनेक ठिकणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे वाहतूककोंडीतही भर पडली.
दिवाळी अवघ्या दहा दिवसांवर अली आहे. काेरोना संसर्गामुळे गेले काही महिने बंदिस्त जीवन जगणाऱ्या मुंबईकरांनी पुनश्च हरिओमनंतर तसेच दिवाळीच्या पाशर्वभूमीवर उत्साहात उत्सवी खरेदी करण्याला रविवारी प्राधान्य दिले. कपडे ,दागिने, सजावटीसाठी वस्तू खरेदीसाठी अनेकजण दादर परिसरात येत आहेत. मास्क लावणारे मुंबईकर सुरक्षित अंतर मात्र पाळत नसल्याचे चित्र हाेते.
सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने अनेकांनी खासगी वाहनांचा वापर केला. खरेदीसाठी अनेकजण दादरला प्राधान्य देतात. रविवारी दादर टीटी, टिळक ब्रीज,पानेरी जंक्शन,प्लाझा यासोबतच सायन, कुर्ला तसेच सीएसएमटी परिसरात वाहतूककोंडी झाली होती, असे एका वाहतूक पोलिसाने सांगितले.
सुरक्षेसाठी मास्कचा वापर
दिवाळीसाठी खरेदी आवश्यक आहे. सार्वजनिक वाहने उपलब्ध नसल्याने इतर वाहनांनी यावे लागत आहे. दिवाळी खरेदीची गर्दी काेरोना संसर्गास आमंत्रण देणारी असली तरी आम्ही सुरक्षेसाठी मास्कचा वापर करत आहोत. - संगीता सोनवणे, ग्राहक