मुंबईच्या बाजारपेठा फणसांंनी सजल्या, आवक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:14 AM2018-04-09T02:14:48+5:302018-04-09T02:14:48+5:30
वरून काटेरी दिसला तरी चवीला गोड असलेल्या फणसांची आवक मुंबईत सुरू झाली आहे. दादर, कुर्ला, क्रॉफर्ड मार्केटमध्ये दुकाने फणसांंनी सजली आहेत.
मुंबई : वरून काटेरी दिसला तरी चवीला गोड असलेल्या फणसांची आवक मुंबईत सुरू झाली आहे. दादर, कुर्ला, क्रॉफर्ड मार्केटमध्ये दुकाने फणसांंनी सजली आहेत. दादर येथे किरकोळ बाजारात १६० ते २४० रुपये किलो दराने फणस विकला जात आहे, तर काही दुकाने आणि हातगाड्यांवर सुट्टे गरे विकले जात आहेत.
कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथून आठवड्याला १० ते १५ टन फणस वाशी मार्केटमध्ये येतात. या फणसांची विक्री वजन किंवा नगावर करण्यात येते. २० ते २२ रुपये किलोप्रमाणे आणि १०० ते २०० रुपये नग याप्रमाणे फणसांची विक्री केली जाते. कोकणात पडलेल्या अवकाळी पावसामुळे तेथून मालाचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे, अशी माहिती फणस व्यापाऱ्यांनी दिली.
>‘कापा’ फणसाला मागणी
फणसांचे कापा आणि बरका (रसाळ) असे दोन प्रकार आहेत. कापा प्रकारातील फणसाचे गरे कडक असतात आणि चवीला गोड असतात. या फणसात कमी चिकटपणा असतो. तर बरका प्रकारातील फणसाचे गरे हे मऊ असतात आणि चवीला मध्यम गोड असतात. या फणसात जास्त चिकटपणा असतो. बरका फणसाच्या बिया काढूनदेखील विकल्या जातात. या बियांची आमटी, सुकी भाजी बनवण्यात येते. सध्या बाजारात कापा प्रकारातील फणस जास्त प्रमाणात विकले जात आहेत.
>किंमत वाढली
फणसांची आवक सुरू झाली असली, तरी मागणीच्या तुलनेत मालाचा पुरवठा होताना दिसत नाही. त्यामुळे किंमत १० टक्क्यांनी वाढली आहे. तसेच पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी फणसांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती फणस व्यापारी शिवकुमार यांनी दिली. २० ते २२ रुपये किलोप्रमाणे आणि १०० ते २०० रुपये नग याप्रमाणे फणसांची विक्री
केली जाते.