Join us

बाजारपेठा, रस्त्यांवर शुकशुकाट; नाक्यांवरील घोळके मात्र बेलगाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:06 AM

मुंबई : पूर्व उपनगरातील दुकानदारांकडून विकेंड लॉकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. रस्त्यांवरही शुकशुकाट होता. परंतु, नाक्या-नाक्यांवर उभ्या राहणाऱ्या घोळक्यांनी ...

मुंबई : पूर्व उपनगरातील दुकानदारांकडून विकेंड लॉकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. रस्त्यांवरही शुकशुकाट होता. परंतु, नाक्या-नाक्यांवर उभ्या राहणाऱ्या घोळक्यांनी जमावबंदीच्या आदेशाला पायदळी तुडवल्याचे चित्र काही ठिकाणी पहावयास मिळाले.

कुर्ला पश्चिमेकडील पाइपरोड, कुर्ला स्थानक, कल्पना चित्रपटगृह, बैलबाजार, जरीमरी परिसरात लॉकडाऊनच्या नियमांना अक्षरशः हरताळ फासण्यात आला. नाक्यांवर घोळके करून उभे राहणाऱ्यांनी जमावबंदी, संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन तर केलेच, पण अनेकांच्या तोंडावर मास्कही दिसून आला नाही. स्टेशनलगत असलेल्या पाइपरोड भागातील नागरिक कोरोनाबाबत कोणतेही गांभीर्य नसल्यासारखे बाहेर फिरत होते. तेथील दुकाने बंद असली तरी रस्त्यावर माणसांची बरीच गर्दी होती. फुटपाथवर एका फेरीवाल्याने बिनदिक्कत दुकान सुरू ठेवले होते. तेथे घोळके करून काही युवक निवांत गप्पा मारीत उभे होते. पोलिसांनी मात्र या परिसरात फेरी मारली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

घाटकोपर, साकीनाका, असल्फा, चांदिवली, पवई परिसरात कालसारखीच शांतता होती. विकेंड लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सुटीचा आनंद येथील नागरिकांनी कुटुंबीयांसोबत घालविण्यात समाधान मानले. पवई तलावाजवळ सकाळी मॉर्निंग वॉकसाठी काही जणांनी धाव घेतली. परंतु तेथे नेहमीसारखी गर्दी दिसून आली नाही. फिनिक्स मॉलजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अन्य आवश्यक कामांसाठी बाहेर पडलेल्यांव्यतिरिक्त एकही वाहन त्यांनी पुढे सोडले नाही. त्यामुळे रस्ते मोकळे होते.

कांजूरमार्ग, भांडूप, मुलुंड परिसरात रस्त्यांवर शुकशुकाट होता. व्यापाऱ्यांनीही शासनाच्या आवाहनाला १०० टक्के प्रतिसाद दिला. भांडुपच्या शिवाजी तलावाजवळ सकाळच्या सुमारास काहीजण फिरताना दिसले. पोलिसांची गाडी दिसताच त्यांनी पळ काढला. विक्रोळी पूर्वेकडे असलेल्या झोपडपट्ट्यांलगत नाक्यांवर काही तरुणांचे घोळके चकाट्या पिटत बसल्याचे दिसून आले. गोदरेज कम्पाउंड, आरसीटी मॉल परिसरात शांतता होती.

चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, सायनमध्ये पोलिसांनी कडोकोट बंदोबस्त तैनात केल्यामुळे नागरिकांच्या मुक्त संचारावर अंकुश निर्माण झाला. सायन पनवेल मार्ग, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, एससीएलआर मार्गावर शुकशुकाट होता. पोलीस आणि पालिकेचे कर्मचारी ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन करत होते. तरीही कोणी विनाकारण बाहेर पडल्यास ‘पोलिसी भाषेत’ समज दिली जात होती.

.....................

तळीरामांची वणवण...

तळीराम मात्र दारूसाठी वणवण भटकताना दिसले. नाकाबंदी चुकवून आडवळणाचा मार्ग अवलंबत वाइनशॉप गाठण्याचा प्रयत्न अनेक जणांनी केला. परंतु, बरीच बरीच मद्यालये बंद असल्याने त्यांची पचाईत झाली. कुर्ला, असल्फा, चेंबूर आणि पवईतील हिरानंदानी भागात काही वाइन शॉपचालकांनी बंद दाराआडून तळीरामांची मदत केली.