Join us  

मरोळ सुक्या मासळी बाजाराची वेळ बदलली; संतप्त कोळी महिलांनी बाजाराचे कुलूप तोडून आत केला प्रवेश!

By मनोहर कुंभेजकर | Published: December 22, 2022 1:05 PM

सदर निर्णयामुळे येथील सुकी मासळी विक्रेते व खरेदीदार यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मनोहर कुंभेजकर, मुंबई-अंधेरी पूर्व मरोळ येथे पुरातन सुक्या मासळीचा बाजार आहे.या सुकी मासळी बाजारात  व्यवसाय करणारे विक्रेते व खरेदीदार यांना पालिकेचे सहाय्यक आयुक्त बाजार प्रकाश रसाळ यांनी काढलेल्या आदेशानुसार दि,1 डिसेंबर 2022 पासून येथील मासळी बाजाराची वेळ बदलली.गुरुवारी  दुपारी दोन वाजता बाजारात मासळी आणण्यास परवानगी दिली जाईल व शुक्रवारी दुपारी 4 वाजता माल विकण्यास परवानगी दिली जाईल असे परिपत्रक काढले.

सदर निर्णयामुळे येथील सुकी मासळी विक्रेते व खरेदीदार यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. बाजाराची वेळ बदलल्याने कोळी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून मासळीच्या वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.कोळी महिलांच्या व्यवसायची मोठी हानी झाली आहे.

 त्यामुळे  या वेळेत बदल करावा या मागणीसाठी आज येथील मरोळ बाजार   मासळी विक्रेता  कोळी  महिला संस्थेच्या कोळी सभासद महिलांनी आज सकाळी कायदा हातात घेत या बाजाराचे  कुलूप तोडत मासळी बाजाराचा ताबा घेत बाजारात प्रवेश केला.आता आम्हाला पोलिस ठाण्यात बोलवले असून अटक करण्याची शक्यता असल्याची माहिती या संस्थेच्या अध्यक्ष राजेश्री भानजी यांनी लोकमतला दिली.त्यामुळे त्याचे पडसाद राज्यातील विविध कोळीवाड्यांमध्ये उमटण्याची शक्यता आहे.

सुमारे 150 वर्षांच्या या पुरातन बाजारात मासळी विक्रेत्या कोळी महिलांना बुधवारी मध्यरात्री 3 वाजता मासळीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश देवून गुरुवारी सकाळी 6 वाजता मासळी विक्री करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी राजेश्री भानजी यांनी पालिकेचे सहाय्यक आयुक्त बाजार प्रकाश रसाळ यांना केली आहे.

सोशल मीडियावर राजेश्री भानजी यांनी पोस्ट टाकत येथील बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्था या संस्थेच्या महिला सभासद या खरोखरच माझ्या  वाघिणी आहेत. आज त्यांनी चांगल्या कामासाठी महानगरपालिकेचा कायदा हातात घेतल्याबद्धल त्यांनी शाबासकी दिली आहे.

काल  रात्रभर कोळी महिला रस्त्यावर बसलेल्या होत्या. त्यांना रात्रीचा होलसेल मार्केट मान्य नव्हता. त्यांना गुरुवारी सकाळी मार्केट पाहिजे होते. परंतू महानगरपालिकेने गेटवर  लावलेले कुलूप आमच्या सर्व गावोगावच्या कोळी महिलांनी तोडून टाकत आपल्या मासळीच्या गाड्या बाजारात आत घेतल्या अशी माहिती त्यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :मुंबई