Join us

मरोळ पोलीस वसाहतीत चोरी , तुटलेल्या खिडकीतून प्रवेश करत ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 4:41 AM

मरोळ पोलीस वसाहतीत चंद्रकांत बागल (५८) हे कुटुंबीयांसोबत राहतात.

मुंबई : पोलीस वसाहतींच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असताना, याच वसाहतीतील तुटलेल्या खिडकीतून चोराने प्रवेश करत, साडेपाच लाखांचे दागिने पळविल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. मरोळ पोलीस वसाहतीत ही घटना घडली. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मरोळ पोलीस वसाहतीत चंद्रकांत बागल (५८) हे कुटुंबीयांसोबत राहतात. ते मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू आहे़ इमारतीला बांबू लावण्यात आले आहेत. घरात पाणी गळत असल्याने, सोमवारी इमारतीतील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामगारांसहित घरांची पाहणी केली. पाहणी करताना स्वयंपाकघरातील तुटलेल्या खिडकीला पाहून त्या ठिकाणाहून चोरी होऊ शकते, असे सांगून, लवकरच काम करण्याचे आश्वासन देत अधिकारी, कामगारांसहित निघून गेले.बेडरूममध्ये पाणी पडत असल्याने ते हॉलमध्येच झोपले होते. रात्री १२च्या सुमारास हॉलमध्येही पत्नीच्या अंगावर पाणी गळत असल्याने, ते जागे झाले. ते आवरून बाथरूममध्ये जाण्यासाठी गेले, तेव्हा किचनमधील तुटलेल्या खिडकीला लावलेला प्लायवूड दिसला नाही. तेथून बेडरूममध्ये जाताच कपाटातील दागिने आणि पैसेही गायब होते.यात, ५१ हजार रुपयांच्या रोकडसहित ५ लाख ६६ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत.

टॅग्स :गुन्हेगारी