डहाणू : डहाणू तालुक्यातील कवडास धरणामूळे विस्थापित झालेल्या कुटुंबाचे पुनर्वसन वणई चंद्रनगर येथे करण्यात आले होते. त्या पुनर्वसनास ३० वर्षे एवढा प्रदीर्घ कालावधी लोटला आहे. पुनर्वसनानंतर बऱ्याच समस्यांवर मात करून ग्रामपंचायतीने पेसा निधीतील ५ टक्के निधी हा सामाजिक रूढी, परंपरा याची जपवणूक करण्यासाठी राखीव ठेवला असून त्यातून अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर २१ जोडप्यांचे सामूहिक विवाह करून सामाजिक बांधीलकी जपली आहे.समाजामध्ये विवाह सोहळ्यावर प्रतिष्ठेच्या नावाखाली अनाठायी खर्च केला जातो. यामुळे मोलमजुरी करणाऱ्या माणसाला कर्जबाजारी व्हावे लागते. मात्र, आदिवासी बांधवांच्या सामाजिक परंपरेचे दर्शन घडेल. असा परंपरागत सामुदायीक विवाह वणई चंद्रनगर ग्रामपंचायतीने आयोजित केला होता. या पूर्वी याच गावातील जिल्हा परिषदेच्या चंद्रनगर शाळेने न पेटणाऱ्या झोपडीच्या प्रयोगाने राष्ट्रीयस्तरावर स्थान मिळवून नाव लौकिक मिळवला होता. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हे गाव हागणदारीमुक्त झालेले आहे. शासनाच्या निधीचा योग्य वापर करून ग्रामपंचायतीने आकर्षक कार्यालय उभारले आहे. गावाच्या या प्रगतीसाठी पदवीधर शिक्षक मधू चौधरी, शैलेश राऊत, सरपंच निलेश तल्हा, उपसरपंच प्रताप सांबर, विष्णू बसवत, ग्रामविकास अधिकारी अश्विनी तांडेल यांच्या बरोबरच गावातील युवांनी विशेष परिश्रम घेतले. पेसा अंतर्गत निधीतून सामुहिक विवाह करणारी डहाणू तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. (वार्ताहर) पेसाच्या निधीचा वापर केल्याने सामाजिक व शैक्षणिक कार्याला गती येत आहे. याच निधीतून ग्रामपंचायतीने डिजिटल शाळा व सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा हे उपक्र म हाती घेतले आहे. - शैलेश राऊत, शिक्षक/समाजप्रबोधक चंद्रनगर
अक्षयतृतीयेला २१ जोडप्यांचा विवाह
By admin | Published: April 30, 2017 3:47 AM