Marriage : नोकरी नसल्यानं ऑफर कमी यायच्या, सुधीर मुनगंटीवारांच्या लग्नाची मजेशीर गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 02:03 PM2021-08-21T14:03:34+5:302021-08-21T14:06:16+5:30
Marriage : भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमतच्या मुलाखतीत त्यांच्या लग्नाची गोष्ट उलगडली. नोकरी नसल्याने मुलींच्या ऑफर कमीच होत्या, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई - राजकारणात मंत्रीपदाची ऑफर मिळालेले, राज्याचे अर्थमंत्री म्हणून कामकाज पाहिलेले भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही लग्नासाठी मुलींकडून ऑफर कमीच होत्या. राजकारणापलिकडील आपलं आयुष्य प्रथमच सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांसमोर उलगडलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या लग्नाची गोष्टही सांगितली. लग्नासाठी मुलीचे वडील मुलगा शोधताना मुलीचं भवितव्य सुरक्षीत आहे का, हे पाहतात. त्यासाठी, सरकारी नोकरी आहे का, एखादं मोठा उद्योग आहे का, हेही पाहिलं जातं. मात्र, मला नोकरीही नव्हती आणि माझा उद्योगही नव्हता, जे काही आहे ते वडिलांचच, अशी आठवण सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितली.
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमतच्या मुलाखतीत त्यांच्या लग्नाची गोष्ट उलगडली. नोकरी नसल्याने मुलींच्या ऑफर कमीच होत्या, असेही त्यांनी सांगितले. पुसदमध्ये माझे आणि आई मामा गेले होते, तेव्हा तिथं एक देखणी, सुंदर मुलगी आईच्या बाजूला बसली होती. त्यावेळी, आईने तिची विचारपूस केली. नाव, आडनाव, वडिल, कुटुंब ही चर्चा झाली, मग आईला ती पसंतही पडली. पण, आमच्याकडे स्वत:हून ऑफर द्यायची पद्धत नसते. मुलीकडून ऑफर आली पाहिजे.
त्यातच, चंद्रपूरमधील एका मेळाव्यात ती मुलगी वर पाहण्यासाठी आली होती. त्यावेळी, मी त्या मेळाव्याचा आयोजक आणि अध्यक्ष होतो. मी अध्यक्षीय भाषण दिल्यानंतर त्या मेळाव्यात पहिला परिचयही मीच दिल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. साधना व्यवहारे असं माझ्या पत्नीचं जुनं नाव होतं. आता ते नाव मी सपन असं केलंय. या मेळाव्यात मी स्टेजवर असल्यानं मुली पाहायला मिळायच्या, त्यावेळी आमच्या मित्रानं म्हटलं, भाऊ ती सुंदर मुलगी आहे, तिच्याकडून ऑफर आली पाहिजे. 15 व 16 एप्रिल 1990 रोजी हा मेळावा होता. त्या मेळाव्यात ऑफर आलीच नाही. आम्ही वाट पाहत होतो. मग, 17 एप्रिल रोजी निरोप आला. कारण, आमचे साडू वगैरे सगळे डॉक्टर होते. आमच्या गावापासून 15 किमीवर असलेल्या त्यांच्या गावातील घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर, दोन दिवसांतच आमचा साखरपुडा झाला अन् शुभमंगल घडलं, असा किस्सा सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितला.