Join us

मध्यस्थाला पैसे न दिल्याने लग्न मोडले

By admin | Published: May 22, 2015 11:00 PM

लग्न जमविण्याचे काम करणाऱ्या मध्यस्थीला वीस हजार रुपये न दिल्याने त्याने चक्क ठरलेले लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण तालुक्यातील एका गावात नुकताच घडला.

बिर्लागेट : लग्न जमविण्याचे काम करणाऱ्या मध्यस्थीला वीस हजार रुपये न दिल्याने त्याने चक्क ठरलेले लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण तालुक्यातील एका गावात नुकताच घडला. या प्रकारामुळे कोणताही दोष नसताना सुशिक्षित वराची परिसरात नाहक बदनामी होत आहे.सध्या कल्याण तालुक्यात लग्न सोहळ्यांचा धूमधडाका सुरू आहे. भटजी, बँजो, डिजे, मंडप यांना सुगीचे दिवस आले आहेत. विवाह म्हणजे दोन मनांचे मिलन, वधू-वरांचे वैवाहिक आयुष्य आनंदी जावे म्हणून पालकमंडळी अक्षरश: कर्जबाजारी होतात. टिटवाळा परिसरातील एका गावातील सुशिक्षित तरुणाचे लग्न खडवली येथील एका मध्यस्थाने जमविले. दोन्ही पक्षांनी मिळून लग्नाची तारीख, वेळ काढली. वरपक्षाने या विवाह सोहळ्याकरीता मंडप-२५ हजार, बँजो १५ हजार, डिजे १२ हजार, बस १५ हजार, जेवण ५० हजार आदींची व्यवस्था केली. यानंतर हे लग्न जमविणाऱ्या मध्यस्थीने वर पक्षाकडे जाऊन मला वीस हजार द्या अशी मागणी केली. मात्र आता आमचा खर्च खूप झाला. नंतर बघू, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने मध्यस्थीला याचा भयंकर राग आला. त्याने मुलीच्या मामाला पाठवून लग्न मोडल्याचे सांगितले. झाल्या प्रकाराने वर पक्षाला धक्काच बसला. गावात आपली नाहक बदनामी होेईल या भीतीने नवरा मुलगा आत्महत्येचा विचार करू लागला. मात्र त्याच्या मोठ्या भावाने वेळीच सावरुन टिटवाळा पोलीस ठाणे गाठले. मात्र तेथे देखील त्यांना न्याय मिळाला नाही. उलट त्यांच्याकडूनच वधू पक्षाला कोणताही त्रास होणार नाही असे लिहून घेतल्याने परिस्थिती अजूनच बिकट बनली. लग्न मोडले, चूक नसताना नाहक गावात बदनामी झाली या भीतीने नवरदेवाने ३ ते ४ दिवसापासून अन्न, पाणी वर्ज्य केले आहे. ही माहिती नवरदेवांच्या नातेवाईकाने कोणाचेही नाव न छापण्याच्या अटीवर दिली.मुला-मुलीने एकमेकांना पसंत केले होते. त्यानंतरच पुढील तयारी केली. मात्र मध्यस्थीने केवळ पैसे दिले नाही म्हणून वधूपक्षाला सांगून हे लग्न मोडले. - नवरदेवाचा मामा, टिटवाळाविविह सोहळ्यास समाजाने मान्यता दिली आहे. त्यामुळे यामध्ये मध्यस्थी ठेवणे चुकीचे आहे. हे लोक दोन कुटुंबाच्या भावनांशी खेळतात. त्याच्यासाठी पैसा सबकुछ असते. - संजय थोरात, अध्यक्ष समाजउत्क्रांती संस्था, कल्याण