मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी आता ऑनलाइन कार्यक्रमांना महत्त्व आले आहे. कार्यालयांमध्येदेखील कर्मचाऱ्यांची गर्दी जमायला नको यासाठी वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे आता सत्यनारायण पूजा, वाहन पूजा, गृहप्रवेश, विवाह आणि तेराव्यापर्यंतचे विधी ऑनलाइन होऊ लागले आहेत.
ऑनलाइनच्या वाढत्या मागणीमुळे आता पूजा संपन्न करणारे पंडित, गुरुजीदेखील स्वतःमध्ये बदल घडवून घेत आहेत. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी न जाता लॅपटॉप अथवा मोबाइलच्याआधारे ते घर बसल्याच विधी करत आहेत. तसेच जे पंडित विधी करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी जातात, असे पंडित, गुरुजी कार्यक्रमाच्या येथे मास्क सॅनिटायझर फिजिकल डिस्टन्सिंग हे सर्व नियम पाळूनच विधी पूर्ण करत आहेत.
कुठले विधि होत आहेत ऑनलाइन?
कोरोनाच्या काळात हल्लीच ऑनलाइन विवाह आणि साखरपुडा संपन्न झाल्याचे अनेक उदाहरणे समोर आली होती. याचप्रमाणे तेरावे, वाहन पूजन, सत्यनारायण, गृहप्रवेश, गणेश पूजन व आरतीदेखील ऑनलाइन होत आहे.
पूजेला आले तरी मास्क !
अनेक ठिकाणी कमी लोकांच्या उपस्थितीत पूजा व विवाह यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ऑफलाइन विधी होत असले तरी विधी करणारे पंडित पूर्णवेळ मास्कमध्ये दिसत आहेत. सार्वजनिक समारंभांच्या ठिकाणी पोलिसांचीदेखील करडी नजर असल्याने आता नागरिक देखील अशा ठिकाणी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करताना दिसून येत आहेत.
कोरोनाच्या काळात अनेकजणांनी आपले लग्न उरकून घेतले, तर अनेक जणांनी आपल्या नवीन घरात गृहप्रवेश केला. अशावेळी प्रत्यक्ष ठिकाणी जायला न जमल्यास ऑनलाइन पूजाविधी करण्यात आले. यामुळे कोरोनाचा प्रसार थांबण्यास मदत झाली.
- मंदार विभुते
ऑनलाइन पूजा, विवाह यांची मागणी आता वाढू लागली आहे. सुरुवातीला या गोष्टी जमणार नाहीत असे वाटायचे. मात्र चांगल्या दर्जाचा कॅमेरा व माइक असल्यास लोकांसोबत ऑनलाइन संवाद चांगल्या प्रकारे साधता येतो. काही ठिकाणी नाईलाजाने प्रत्यक्ष जावे लागते. मात्र अशा वेळीदेखील कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.
- प्रीतम भानुशे