पूर्वीच्या काळी यथासांग पार पडणारे विवाह आठवले, की बराच काळ म्हटल्या जाणाऱ्या मंगलाष्टका आठवतात. हल्ली मुहूर्त अचूकपणे साधणे काहीसे आऊटडेटेड होत चालल्यामुळे घटका भरणे ही गोष्ट फक्त वाक्प्रचारातच राहतेय की काय असे वाटू लागले आहे. मनगटावर घड्याळ बांधायला जोपर्यंत सुरुवात झाली नव्हती तोपर्यंत आपल्याकडे वेळ पाहण्यासाठी ‘घटिकापात्र’ नावाचे एक साध उपकरण वापरल जायच. पाण्यान भरलेल्या घंगाळ्यासारख्या मोठ्या भांड्यात एक विशिष्ट आकाराची छिद्र पाडलेली वाटी अलगद सोडली जायची, वाटीला छिद्र असल्याने त्यातून हळूहळू पाणी आत शिरून वाटी बुडली की एक घटका भरली, असे म्हणत असत. या वाटीला घटिका तर मोठ्या भांड्याला पात्र असे मिळून घटीकापात्र असे त्या उपकरणास म्हटले जाई.
हल्ली लग्न घटिका चोख नियोजन करून पार पाडल्या जातात. कारण लग्न म्हणजे केवळ दोन जिवांचा संगम नव्हे, तर दोन कुटुंबीयांचे जिवाभावाचे नाते असते. लग्नासारख्या गोष्टी एकदाच होत असतात, याच फार कौतुक आपल्याला असत. ते एकदाच होत असल्याने अगदी दणक्यात आणि झोकात व थाटामाटातच व्हायला हवे, अशी आपली परंपराच आहे जणू . हळूहळू काळ बदलला तसा हा लग्न सोहळा विधींच्या ही पलीकडे साजरा करण्यात येणारा एक इव्हेंट झाला आहे. म्हणूनच अगदी हटके स्टायलिश लग्नपत्रिका ते प्रि वेड शूट, हॉलची सजावट, लग्नातील फोटोशूट, लग्नातील जेवणे, भटजी, लग्न विधींसाठी लागणारे सामान अशी सगळीच व्यवस्था चोख पुरविणाऱ्या ‘पॅकेज’ सिस्टिमची मागणी वाढत आहे.
लग्नातील शॉपिंग, मेहंदी, हळद, सीमांत पूजन अशा सगळ्या गोष्टी विचारात घेऊन केवळ वधू-वरच नव्हे तर करवल्या, माता पिता ह्या सगळ्यांसाठी ही कपड्यांची थीम बघितली जाते. काही काही सोहळ्यात तर येणाऱ्या पाहुण्यांनादेखील ड्रेसकोड दिले जातात. हॉलमध्ये दिव्यांची रोषणाई, विविध प्रकारचे डेकोरेशन तसेच बारातियोंका हटके स्वागत करत लग्नसोहळा दिमाखदार करण्यावर भर दिला जातो.
बरं हे सगळं तुम्हाला हव आहे पण कराव कस ह्याच उत्तर देण्यासाठी वेडिंग प्लॅनर किंवा वेडिंग मॅनेजमेंट संस्था आहेत की, आजकाल हॉलवालेदेखील डोली, नवरदेवासाठी घोडा, बॅन्ड, बग्गीसहित जेवणाचे उत्तम पॅकेज देतात. लग्नविधीचे आवश्यक साहित्य म्हणजेच होमकुंड, सुपाऱ्या, पाट, चौरंग, अगदी समईच्या वाती, फॅन्सी फटाके अशा अनेक वस्तू पुरविल्यामुळे ऐन लग्नात गडबड व धावपळ होत नाही. सगळं काही वेडिंग प्लॅनर किंवा हॉलवाल्यांवर सोपवले की, आपण लग्न सोहळा एन्जॉय करण्यास मोकळे असा विचार अनेक पालकांमध्ये रुजलेला आढळतो.
हॉलमध्ये जर लॉनदेखील उपलब्ध असेल तर थीम वेडिंग करण्यास ऐसपैस जागा मिळते. हा लॉन्सचा ट्रेंडही हल्ली मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. विविध प्रकारच्या देशी, विदेशी फुलांच्या माळा, रंगीबेरंगी कारंजे, सेल्फी पॉईंट्स, डोळे दिपवणारी विविध प्रकारच्या साहित्याची सजावट करून आकर्षक असे लग्नमंडप सजविण्यात येतात. अनेक कार्यालये आणि लॉन्सचालकांनी दोन लाखांपासून पुढे असे पॅकेजेस उपलब्ध करून दिले आहेत.
लग्नात सरबराई कितीही केली तरी जेवण कसे असेल त्यानुसार लग्न चांगले झाले की, नाही ह्याबद्दलची प्रतिक्रिया नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून हमखास मिळते.
लग्नातील जेवण चांगले असेल तर पाहुणे मंडळी खूश होतात. नाश्त्यापासून जेवणापर्यंतचे पॅकेजेस केटरर्सकडून देण्यात येतात.
महाराष्ट्रीयन पंचपक्वाने, वेलकम ड्रिंक्स, रंगीबेरंगी मॉकटेल्स, पंजाबी, राजस्थानी, चायनीज, इटालियन, चाट, केळीच्या पानाच्या पंगतीपासून, बुफेपर्यंत आणि त्यानंतर रुचकर पानापर्यंत सर्व काही केटरर्सकडून पुरविले जाते.
दीडशे रुपये थाळीपासून पुढे जितक्या पदार्थांचा समावेश होईल, त्यानुसार केटरिंगचे पॅकेज ठरत आहे. अगदी आठशे ते दीड हजार रुपये प्रति ताट इतका त्याचा दर असतो.
शिवाय स्टार्टर्स असतात ते वेगळे. स्वादिष्ट आणि उत्तम जेवण लग्न सोहळा वर्षानुवर्षे लक्षात ठेवण्यास मदत करते.
खरंतर लग्न सोहळयाचं नियोजन आणि व्यवस्थापन ही एक कला आहे. या सोहळयात भावना अधिक जोडलेल्या असतात.
काही ठिकाणी लग्नानंतर फिरायला जाण्यासाठीचे पॅकेजही उपलब्ध असते. देश-विदेश सफर करण्यासाठी आगाऊ बुकिंग कमी खर्चात करून घेण्यासाठी हल्ली तरुणाई अशा पॅकेजेसचा विचार करताना दिसते. शिवाय असे अनेक देश आहेत जिथे तुम्ही विना पासपोर्ट ही फिरू शकता. त्यामुळे रोमँटिक टूर पॅकेज, हनीमून टूर पॅकेज हे काही हजारांपासून सुरु होतात.