Join us

लग्नाचा बार उडणारच...!

By admin | Published: November 18, 2016 4:25 AM

तुळशी विवाह समाप्तीनंतर राज्यभर लग्नसराईला सुरूवात झाली असली, तरी नोटकल्लोळामुळे

मुंबई : तुळशी विवाह समाप्तीनंतर राज्यभर लग्नसराईला सुरूवात झाली असली, तरी नोटकल्लोळामुळे लग्नकार्य असलेल्या कुटुंबांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. मात्र केंद्रीय अर्थ सचिवांनी लग्नकार्य असलेल्या कुटुंबांसाठी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा अडीच लाख रुपयांपर्यंत वाढवल्याने लगीन घरांमध्ये एकच आनंद व्यक्त होऊ लागला आहे. विशेषत: मंडप डेकोरेटर, डीजे आॅपरेटर आणि कॅटरर्सचे ‘अच्छे दिन’ सुरू झाल्याची चर्चा बाजारात आहे.याआधी लग्नकार्यासाठी काढलेल्या लाखो रुपयांत बहुतेक नोटा या पाचशे आणि हजार रुपयांच्या होत्या. मात्र पंतप्रधानांच्या घोषणेनंतर सर्वच पैसे रद्दीसमान झाले होते. लग्नासाठी हॉलबुकिंग, मंडप डेकोरेटर, डीजे-वाजंत्री, कॅटरर्स यांना पैसे द्यायचे तरी कसे, असा प्रश्न वरपित्यांना सतावू लागला होता. बहुतेकांनी खर्चाला लगाम घालत इमारतीखालील मंडप आणि वरातीमधील वाजंत्रीच्या आॅर्डर रद्द केल्या होत्या तर हॉल आणि कॅटरर्सला चेकने पैसे घेण्यासाठी विनवण्या सुरू केल्या. मात्र केंद्रीय अर्थ सचिवांनी लग्नकार्य असलेल्या कुटुंबांना पत्रिका दाखवून एकत्रितपणे अडीच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मर्यादा वाढवल्याने बहुतेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.याउलट गेल्या १० दिवसांपासून लग्नसराईला सुरूवात झाल्यानंतर मंडप डेकोरेटर, वाजंत्री आणि आचाऱ्यांच्या हाती काम नव्हते. मात्र अर्थ सचिवांच्या घोषणेनंतर या सर्वच घटकांत आनंदाचे वातावरण आहे. लग्नकार्यासाठी काढलेल्या लाखो रुपयांत बहुतेक नोटा या पाचशे आणि हजार रुपयांच्या होत्या. मात्र पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनंतर सर्वच पैसे रद्दीसमान झाले होते. लग्नासाठी हॉल बुकिंग, मंडप डेकोरेटर, डीजे-वाजंत्री, कॅटरर्स अशा विविध घटकांना पैसे द्यायचे तरी कुठुन असा प्रश्न वरबापांना सतावू लागला होता.नव्या नोटांमुळे आणि आर्थिक मर्यादा वाढवल्याने काही रद्द झालेल्या आॅर्डर पुन्हा मिळण्याची आशा संबंधितांमध्ये निर्माण झाली आहे. तर काही नव्या आॅर्डरही मिळण्याची शक्यता काही घटकांनी व्यक्त केली आहे. प्रसंगी अर्धी रक्कम रोख आणि अर्धी रक्कम धनादेश स्वरूपात स्वीकारण्याची तयारीही काहींनी व्यक्त केली आहे.