घाटकोपर येथे विवाहित तरुणाची आत्महत्या
By admin | Published: June 30, 2015 01:21 AM2015-06-30T01:21:54+5:302015-06-30T01:21:54+5:30
घाटकोपरच्या पंतनगर परिसरातील एका इमारतीत दीपक नाईक (३२) या तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळला. पंतनगर पोलिसांनी प्राथमिक तपासातून दीपकने दोन दिवसांपूर्वीच गळफास घेत
मुंबई - घाटकोपरच्या पंतनगर परिसरातील एका इमारतीत दीपक नाईक (३२) या तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळला. पंतनगर पोलिसांनी प्राथमिक तपासातून दीपकने दोन दिवसांपूर्वीच गळफास घेत आत्महत्या केल्याचा अंदाज बांधला. दीपकच्या शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलीस सांगतात.
पोलिसांच्या माहितीनुसार पंतनगरातील इमारत क्रमांक ४३मध्ये वृद्ध आई, पत्नी व तीन वर्षांच्या मुलीसोबत दीपक राहत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो घरी एकाकी होता. दीपक आईला मारहाण करत असे. म्हणून अमेरिकेत स्थायिक झालेल्या बहिणीने आईला सोबत नेले. तर दीपकची पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेली होती. पत्नीला दीपकनेच माहेरी धाडल्याची कुजबूज शेजाऱ्यांकडून पोलिसांना ऐकू आली. अधिक चौकशीत उच्चशिक्षित असलेल्या दीपकची नोकरी सुटली होती. तो बेरोजगार होता. त्यातच कौटुंबिक कलहामुळे तो नैराश्येत होता, असे पोलिसांना समजले. पोलीस या माहितीची शहानिशा करणार आहेत.
दरम्यान, सकाळी नाईक यांच्या बंद खोलीतून दुर्गंधी येऊ लागली. शेजाऱ्यांनी दोन दिवसांपासून एकाकी असलेल्या दीपकला पाहिलेही नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. अखेर त्यांनी पंतनगर पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा दीपकचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. गळ्याभोवती दोरी आढळली. त्यावरून गळफास घेत दीपकने आत्महत्या केली असावी, वजनामुळे दोरी तुटून त्याचा मृतदेह खाली पडला असावा, असा अंदाज पोलीस बांधतात. (प्रतिनिधी)