Join us  

विवाहिताही दाखवताहेत घटस्फोटाचे धैर्य

By admin | Published: October 13, 2014 1:54 AM

गेल्या अनेक वर्षांमध्ये मुकी बिचारी कुणीही हाका... अशी गत संसारी महिलांची पाहायला मिळत होती. सासर कसेही असले, नवरा कसाही असला तरी सगळे मुकाट्याने सहन केले जात होते

स्नेहा पावसकर, ठाणेगेल्या अनेक वर्षांमध्ये मुकी बिचारी कुणीही हाका... अशी गत संसारी महिलांची पाहायला मिळत होती. सासर कसेही असले, नवरा कसाही असला तरी सगळे मुकाट्याने सहन केले जात होते. मात्र, आता नकोसे झालेले विवाहबंधन झुगारून देण्याचा धाडसी निर्णय घेण्यात महिलाही आघाडीवर असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणावरून स्पष्ट आहे.ठाणे कौटुंबिक न्यायालयात पहिल्या ४ वर्षांत दाखल झालेल्या विविध याचिका आणि प्रकरणांवर आधारित सर्वेक्षण अहवाल नुकताच तयार झाला आहे. त्यानुसार, गेल्या ४ वर्षांत ठाणे महानगरपालिका परिसरातील घटस्फोटासाठी याचिका करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण सुमारे ४३ टक्के तर महिलांचे प्रमाण ५१ टक्के आहे. गेल्या काही वर्षांत महिला केवळ शिक्षितच नाही तर स्वावलंबी, आहेत. उच्च पदावर कार्यरत असल्याने स्वत:चे निर्णय त्या स्वत:च घेतात. संसार मोडला तर जायचं कुठे, असा प्रश्न एके काळी महिलांसमोर असायचा. त्यामुळे काही झाले तरी सहन करायचे, ही त्यांची मानसिकता होती. मात्र, आता परिस्थिती सहनशक्तीच्या पलीकडे जात असेल तर महिला घटस्फोटाचा पर्याय धैर्याने निवडू लागल्या आहेत. लग्न झाले की, सोसणे किंवा आत्महत्या करणे हेच दोन पर्याय आहे अशी मानसिकता विवाहितांमध्ये कमी आढळू लागली आहे. परिणामी, घटस्फोटासाठी महिला मोठ्या प्रमाणात याचिका दाखल करण्याचे धैर्य दाखवित आहेत, असे मत न्यायालयाच्या विवाह समुपदेशक सुजाता कुलकर्णी यांनी व्यक्त केले. घटस्फोटाच्या दाव्याचा तत्पर निपटारा, पतीकडून पोटगी मिळविणे, मालमत्तेतला वाटा मिळविणे, मुलांच्या जबाबदारीचा हिस्सा त्याला स्वीकारायला लावणे याबाबी कायद्याने शक्य झाल्याने महिलांमध्ये हे धैर्य निर्माण झाले आहे, असे त्या म्हणाल्या.