मंगळ कुजबुजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:07 AM2021-03-06T04:07:11+5:302021-03-06T04:07:11+5:30
परग्रहासंबंधी बऱ्याच विज्ञानकथा आजवर आल्या आहेत; पण पृथ्वी नामशेष झाल्याने मंगळावर वस्ती केली आहे आणि तेथील लोक पृथ्वीवासीयांच्या पुढे ...
परग्रहासंबंधी बऱ्याच विज्ञानकथा आजवर आल्या आहेत; पण पृथ्वी नामशेष झाल्याने मंगळावर वस्ती केली आहे आणि तेथील लोक पृथ्वीवासीयांच्या पुढे तंत्रज्ञानाच्या बाबतीत १,००० वर्षे आहेत, अशा वर्णनाच्या तीन दीर्घ कथांचे हे पुस्तक आहे. लेखक आहेत, प्रा. डॉ. रंजन गर्गे. मुळातले हे सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक. नोकरीनिमित्त कोल्हापूर- औरंगाबाद, असे ते फिरत राहिले आणि अखेर औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य होऊन तेथूनच निवृत्त झाले. निवृत्तीनंतर आता दरवर्षी त्यांचे एक पुस्तक प्रसिद्ध होते. त्यांच्या आवडीचे विषयही अनंत आहेत. सूक्ष्मजीवशास्त्र, गिर्यारोहण, व्यवस्थापन, विज्ञानप्रसार इत्यादी इत्यादी. या विषयांवर ते भाषणे देतात, लेख व पुस्तके लिहितात आणि कार्यशाळाही घेतात.
प्रा. गर्गे यांनी स्वत: काही विज्ञानकथा लिहिल्या, हे तर खरेच; पण मला नवल वाटते, ते त्यांनी प्रस्तुत पुस्तकाच्या अखेरीस, ‘तुम्हाला विज्ञानकथा लिहायची आहे का, मग या त्याच्या आठ पायऱ्या आहेत,’ असे म्हणून होतकरू लेखकांना एक चांगले मार्गदर्शन केले आहे, ते वाचण्यासारखे आहे.
प्रस्तुतच्या पुस्तकात त्यांच्या १) मंगळ कुजबुजला (लेखन साल १९८५), २) अर्धनारीनटेश्वर (लेखन साल २००४) आणि ३) दि न्यूडस (लेखन साल २०१५) या तीन कथा असून, त्यापैकी मंगळ कुजबुजला ९५ पानांची दीर्घ कथा असून, अर्धनारीनटेश्वर ही २८ पानांची कथा आहे आणि शेवटची कथा दि न्यूडस ही ७४ पानांची कथा आहे.
मंगळ कुजबुजला या कथेत २०३० साली झालेल्या अंतराळ मोहिमेत निखिल, कुणाल आणि करुणा हे तीन उच्चविद्याविभूषित लोक सामील झाले होते. भारताची ही मानवी मोहीम होती आणि यापूर्वी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने अशा मानवी मोहिमा मंगळावर यशस्वी केल्या होत्या. तरीही भारताचे अंतराळ वीर मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणार होते आणि नासा व युरोपियन स्पेस एजन्सीने तेथे शिरकाव केला नव्हता. तेथे अनेक विवरे होती आणि बर्फ कार्बन-डाय-ऑक्साइडयुक्त होता. या मोहिमेसाठी भारताने ड्रोन तंत्रज्ञान, ड्रोन डेटा विश्लेषण प्रणाली, जैविक प्रयोगशाळा, पर्यावरणीय अभ्यास अशा जटिल प्रणाली विकसित केल्या होत्या. यासाठी इतर देशांतील संस्थांची मदत घेण्यात आली होती. या मंगळयान मोहिमेत वापरले जाणारे मंगळ-२ यान म्हणजे भाभा-११ आणि पिकॉक-१ प्रयोगशाळा, असे मिळून होते. मंगळापासून काही अंतरावर ही प्रयोगशाळा भाभा-११ पासून अलग होऊन अंतराळात भ्रमण करणार होती. मंगळावरील मातीचे नमुने गोळा करून डॉकिंग पद्धतीने ती पुन्हा भाभा-११ ला जोडली जाणार होती. पृथ्वी ते मंगळ हे अंतर ३० कोटी कि.मी., ते पार करायला पूर्वी नऊ महिने लागत; पण आता संशोधनाद्वारे निर्माण केलेल्या विशेष हायड्रोजन इंधनाच्या वापरामुळे फक्त चार महिनेच लागले. त्यांनी ३ कि.मी.च्या परिसरातून प्रत्येकी १०० ग्रॅमचे २० नमुने गोळा केले. त्यांचे रासायनिक विश्लेषण तेथेच पिकॉक-१ मध्ये सुरू झाले. त्यांना तेथे एक चुंबकीय कुंपण आढळले. म्हणजे तेथे कोणाचा तरी वावर असल्याचे त्यांना समजले आणि एकाएकी त्यांचे अपहरण होऊन त्यांना अग्नी उपग्रहावर नेण्यात आले. अग्नीवर पृथ्वीच्या कितीतरी पटीने अधिक समृद्धी असल्याचे त्यांना जाणवले. तेथे ५०० विद्यापीठे, १,००० महाविद्यालये व ५,००० शाळा होत्या. भव्य स्टेडियम, सुसज्ज प्रयोगशाळा, पाण्यात तरंगती शहरे, अशा एक ना अनेक गोष्टी होत्या. पृथ्वी ते मंगळ हे ३२३ प्रकाशवर्षे दूरचे अंतर कापायला त्यांना केवळ सव्वातीन दिवस पुरेसे होते.
अशाच डॉ. रंजन गर्गे यांच्या इतर दोन कथाही रंजक आहेत. रसिकांनी हे पुस्तक विकत घेऊन मुळातून ते वाचावे.
मंगळ कुजबुजला,
लेखक : डॉ. रंजन गर्गे,
प्रकाशक : क्रिएशन्स पब्लिकेशन, औरंगाबाद
पृष्ठे : १९६ , मूल्य : १५० रुपये
-अ.पां. देशपांडे