मुंबई : रत्नत्रयी ट्रस्ट, आणि साहित्य सत्कार समारोह समिती यांच्या वतीने श्रीमद् विजय रत्नसुंदर सूरीश्वरजी महाराज लिखित ‘मारुं भारत, सारुं भारत’ या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा सायन येथील सोमय्या मैदानावर शुक्रवारपासून सुरू झाला आहे. १० जानेवारीपर्यंत धार्मिक कार्यक्रम चालणार आहेत. या कालावधीत कार्यक्रमाच्या ठिकाणी केंद्र व राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, लोकप्रतिनिधींबरोबरच रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवतदेखील उपस्थित राहणार आहेत. मारुं भारत, सारुं भारत हे श्रीमद् विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी महाराज यांचे ३००वे पुस्तक आहे. हिंदी, गुजराती, मराठी व इंग्रजी या चार भाषेत ते लिहिण्यात आले आहे. सोमय्या मैदानावर पुस्तकाच्या लोकार्पणासह विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन खा. विजय दर्डा, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, राज्याचे गृह राज्यमंत्री राम शिंदे, खा. गोपाळ शेट्टी, किरीट सोमय्या, आमदार मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित राहणार आहेत. रजवाडी नक्षीकाम केलेले ५०० फूट लांब आणि ६० फूट उंच असे शंखेश्वर तीर्थस्थान या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. शिवाय इतर जागेमध्येदेखील मोठ्या प्रमाणात विविध देखावे उभारण्यात आले आहेत. जीवन यात्रा, साहित्य यात्रा, आनंद यात्रा, परिवर्तन यात्रा यांसारख्या काही यात्रांचे दर्शन या समारंभात होणार आहे. शिवाय तरुण वर्गासाठीदेखील या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येत आहेत.(प्रतिनिधी)
‘मारुं भारत, सारुं भारत’ ग्रंथाचा लोकार्पण सोहळा!
By admin | Published: January 03, 2016 3:04 AM