कामगारांच्या कानाखाली मारावेसे वाटते, मेट्रो-३च्या कामामुळे होणा-या आवाजावरून व्यक्त केला संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 06:58 AM2017-09-20T06:58:05+5:302017-09-20T06:58:07+5:30
मेट्रो-३ चे काम करणारे कामगार सकाळी मोठमोठ्याने ओरडत असल्याबाबत, मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर यांनी संताप व्यक्त केला. सकाळी सकाळीच तुमचे कामगार एकमेकांवर ओेरडत असतात.
मुंबई : मेट्रो-३ चे काम करणारे कामगार सकाळी मोठमोठ्याने ओरडत असल्याबाबत, मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर यांनी संताप व्यक्त केला. सकाळी सकाळीच तुमचे कामगार एकमेकांवर ओेरडत असतात. फोनवर मोठ्याने गाणी लावतात. त्यामुळे त्यांच्या कानाखाली मारावेसे वाटते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या गोंगाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणाची नियुक्ती का करत नाही? असा सवाल मुख्य न्यायाधीशांनी एमएमआरसीएलला केला, तसेच रहिवाशांना किमान सहा ते सात तास शांतपणे झोपू द्या, असे म्हणत, उच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोेरेशन प्रा. लि. (एमएमआरसीएल) रात्रीच्या वेळी दक्षिण मुंबईत मेट्रो-३ च्या कामकाजासाठी अवजड वाहने व यंत्रे नेण्यास मनाई केली.
मेट्रो - ३ चे काम रात्रंदिवस सुरू असल्याने, रहिवाशांना रात्रीची झोपही मिळत नाही. एमएमआरसीएल ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे एमएमआरसीएलला नियमांचे पालन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका कुलाब्याचे रहिवासी रॉबीन जैसिंघानी यांनी उच्च न्यायालयात केली आहे. याच याचिकेत एमएमआरसीएलने अर्ज करून, रात्रीच्या वेळी प्रकल्पासाठी आवश्यक सामुग्री व डेब्रिज नेण्यासाठी अवजड वाहनांना दक्षिण मुंबईत प्रवेश करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. यावरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे होती. मात्र, उच्च न्यायालयाने असे आदेश देण्यास नकार दिला. ‘दिवसाही बांधकामाचा खूप आवाज येतो. माणसाला रात्रीच्या वेळी किमान सहा ते सात तास शांतपणाने झोप घेणे आवश्यक आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.
रॉबिन जैसिंघानी यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना, गेल्याच महिन्यात उच्च न्यायालयाने मेट्रो-३ चे काम रात्रीच्या वेळी सुरू ठेवण्यास स्थगिती दिली होती. या पार्श्वभूमीवर एमएमआरसीएलच्या वकील किरण बघालिया यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आणि ट्रॅफिक विभागाने अलीकडेच काढलेल्या परिपत्रकामुळे मेट्रोचे काम करणे कठीण झाले असल्याचे न्यायालयाला सांगितले.
न्यायालयाने रात्रीचे काम करण्यास मनाई केली आहे, तर ट्रॅफिक विभागाने सकाळी सात ते मध्यरात्रीपर्यंत अवजड वाहनांना बंदी घातली आहे. या दोन्ही आदेशांमुळे मेट्रोचे काम करणे शक्य नाही, असे बघालिया यांनी न्यायालयाला सांगितले.‘आमच्या कामाचा पहिला टप्पा पहाटे पाच वाजता संपतो. त्यानंतर, आम्हाला अतिरिक्त सामान आणावे लागते, तसेच कामाच्या ठिकाणावरील डेब्रिजही नष्ट करावे लागते. त्यामुळे रात्रीच्या वेळी बांधकामाची सामुग्री व डेब्रिज नेण्याची परवानगी आम्हाला द्यावी,’ अशी विनंती बघालिया यांनी न्यायालयाला केली.मात्र, त्यांच्या विनंतीवर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. ‘अवजड वाहनांच्या ये-जा मुळे जास्त आवाज होतो. दिवसा आम्हाला कंपने, अवघड वाहनांची ये-जा व सिमेंट मिक्सरचा आवाज सहन करावा लागतो,’ असे रॉबिन यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने एमएमआरसीएलला मध्यरात्री १ वाजता वाहने नेण्याची वेळच येऊ नये, अशा प्रकारे काम करण्याची सूचना केली.
>रात्री कामासाठी अवजड वाहने नेण्यास मनाई
‘सर्व कामे रात्री उशिराच का करायची असतात? सकाळी १० ते मध्यरात्री १ दरम्यान सर्व कामे करा. आम्ही तुमची विनंती मान्य करू शकत नाही. आम्ही जर तुम्हाला परवानगी दिली, तर बाकीचेही काही ना काही कारण पुढे करून परवानगी मागतील. मग त्याला कोण जबाबदार राहील?’ असे न्यायालयाने म्हटले. ‘रहिवाशांना किमान सहा ते सात तास शांतपणाने झोपू द्या,’ असे म्हणत, उच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोेरेशन प्रा. लि. (एमएमआरसीएल)ला रात्रीच्या वेळी दक्षिण मुंबईत मेट्रो-३ च्या कामकाजासाठी अवजड वाहने व यंत्रे नेण्यास मनाई केली.