Join us

सेनेच्या परिवर्तनाआधीच मनसेचे पाऊल

By admin | Published: May 07, 2016 12:42 AM

स्वच्छ, सुंदर कल्याण-डोंबिवलीसाठी शिवसेनेच्या ‘परिवर्तना’ची सुरुवात शनिवारी, ७ मे पासून होणार असली, त्याआधीच कृतीशील पाऊल टाकत मनसेने प्लास्टिक पिशव्यांविरोधात

- मुरलीधर भवार,  डोंबिवली

स्वच्छ, सुंदर कल्याण-डोंबिवलीसाठी शिवसेनेच्या ‘परिवर्तना’ची सुरुवात शनिवारी, ७ मे पासून होणार असली, त्याआधीच कृतीशील पाऊल टाकत मनसेने प्लास्टिक पिशव्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. एक लाख नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप सुरु करून विधायक पाऊल टाकले आहे.या उपक्रमातून मनसेने पालिकेत २० वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेला राजकीय धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. प्लास्टिक पिशव्यांवर पालिकेने आतापर्यंत दोन-तीनदा बंदी घातली. त्याबद्ल पत्रके काढली. पण ठोस कृती केली नाही. त्यामुळे दरवर्षी प्लास्टिक पिशव्यामुळे नाले तुंबतात. पर्यावरणाला हानी पोचते. त्यामुळे १ मे पासून पालिकेने नव्याने प्लास्टिकबंदी लागू करताच मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी जनजागृती आणि कापडी पिशव्या वाटपाची मोहीम हाती घेतली. मनसेचे पदाधिकारी आणि माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांच्या निधनामुळे त्या दिवशी शुभारंभ न करता २ मे रोजी माजी नगरसेविका मंदा पाटील यांच्या प्रभागात कापडी पिशव्यांचे वाटप करुन ही योजना प्रत्यक्षात आणण्यात आल्याचती माहिती मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी दिली. दोन्ही शहरातील पूर्व-पश्चिम भागातील आणि २७ गावांतील नागरिकांना कापडी पिशव्यांच्या वापरण्याची सवय लागावी, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा यावर या मोहीमेचा भर आहे. या मोहिमेतून मनसे एक लाख कापडी पिशव्यांचे वाटप करणार आहे. यातून मनसेने स्वच्छ डोंबिवली उपक्रमात शिवसेनेच्या आधीच एक पाऊल पुढे टाकले आहे. चार वर्षापूर्वीच महासभेत प्लास्टिक पिशव्यावर बंदीचा ठराव मंजूर करुन घेतला, पण त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही, असे मनसेचे माजी नगरसेवक हर्षद पाटील यांनी निदर्शनास आणले. शहराचा समावेश अस्वच्छ शहरांच्या यादीत झाल्यावर सर्वांना जाग आल्याचा टोला त्यांनी लगावला. -संबंधित वृत्त/२उद्धव यांच्यासमोर जादूचे प्रयोग पालिकेत २० वर्षे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांनी शहर सुंदर व स्वच्छ करण्यासाठी कधीच ठोस काम केले नाही. त्यामुळेच त्यांना ‘परिवर्तन’सारखे कार्यक्रम घेऊन जादूचे प्रयोग करावे लागत असल्याची टीका मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्यासमोर हा प्रयोग होईल. ते गेल्यावर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या,’ ची स्थिती होईल. आम्ही कापडी पिशव्या वाटून थेट कृतीला सुरुवात केली आहे. तिला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पालिका प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालते. पण व्यापारी, दुकानदार, ग्राहकांना त्या बदल्यात कापडी पिशव्या कुठे उपलब्ध करुन देते? त्यामुळे महापालिकेची ही मोहीम फसवी व बेगडी असल्याची टीकाही कदम यांनी केली.